Join us

नातेवाइकांना सोडायला जाणे झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. संचारबंदीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने जूनपासून हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये असल्याने तेवढ्या पैशात तिकीट काढून नातेवाइकाला त्याच्या गावी जाऊन सोडणे परवडत होते. प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे परवडत नव्हते. महागड्या तिकिटामुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीटाचा दर १० रुपयांवरून ५० रुपये केला होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर नातेवाईक व मित्र परिवाराला सोडणे चांगलेच महाग पडत होते. मात्र प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत करण्याची मागणी वाढल्यानंतर रेल्वेने ते दर पूर्ववत १० रुपये केले आहेत.

----

वर्षभर होता ५० रुपयांचा भुर्दंड

कोरोनापूर्वी सर्वच स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये होते. यानंतर कोरोनाकाळात प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये झाले. जवळपास वर्षभर प्रवाशांना ५० रुपयांचा भुर्दंड बसला. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांपासून १० रुपये केले आहे; मात्र या काळात अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या कमाईला फटका बसला आहे. दरवाढ होऊनही अपेक्षित कमाई होऊ शकली नाही. आता रेल्वे पुन्हा रुळावर आल्याने उत्पन्नात वाढ होत आहे.

---

दररोज १३ प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री

केवळ लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवासाची मुभा आहे, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट अद्यापही बंद आहे. तर सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्थानकांतून पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या जातात. या ठिकाणी प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू आहे. मात्र अत्यावश्यक असेल त्याच व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येते. सध्या सरासरी १३ प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री करण्यात येत आहे.

----

महिना, प्लॅटफॉर्म तिकीट विक्री

जून - ४३७

जुलै - ४५९

ऑगस्ट - ४०६

----

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्मचे तिकीट दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी जूनपासून पुन्हा १० रुपये घेण्यात येत आहेत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.