कोटींच्या हिऱ्यांवर हात साफ करणारा होता कुंभमेळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:33 AM2019-02-01T01:33:50+5:302019-02-01T01:34:18+5:30
वेशांतर करून देत होता पोलिसांना गुंगारा; बीकेसी पोलिसांकडून अटक
मुंबई : व्यापाºयांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून विक्रीसाठी कोटींचे हिरे घेऊन पसार झालेल्या टोळीचा बीकेसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा म्होरक्या यतीश फिचडीया (३१) हा वेशांतर करून अनेक महिने पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. साधूच्या वेशात काही दिवस कुंभमेळ्यातही त्याने बस्तान मांडले होते. अखेर त्याचा गाशा गुंडाळण्यात आला.
केतन परमार आणि इम्रान खान यांच्यासह त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. ११ डिसेंबर, २०१८ रोजी त्याने भारत डायमंड बोर्समधील सुरेश बोरडा आणि अन्य २५ व्यापाºयांकडून २६ कोटी ९१ लाख रुपयांचे हिरे दलाल बनून उचलले आणि नंतर पसार झाला. पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा आणि परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप खानविलकर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोडकर, अमित उत्तेकर आणि अन्य कर्मचाºयांचा समावेश असलेले बीकेसी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले़
हरविल्याची खोटी तक्रार
फिचडीया हा भारत डायमंड बोर्समध्ये दलालीचे काम करायचा. त्याने तीन महिन्यांपूर्वी हा कट रचला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी विरार पोलिसांत तो हरवल्याची खोटी तक्रार दिली. त्याने नवीन मोबाइल आणि सिमकार्ड घेतले. अजमेर, राजस्थान, दिल्ली, चंदिगड, सिमला, आग्रा, लखनऊ, बिहार, ओडिसा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैदराबाद या ठिकाणी वेशांतर करून तो लपत फिरत होता. इतकेच नव्हे तर अखेर इलाहाबादला जाऊन त्याने साधूचा वेश परिधान केला. पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही आणि त्याला गजाआड करण्यात आले.