मुंबई : माझ्याबद्दल बोलताना सतत सांगत होते ते आमचे गुरु आहेत. आमच्या काही मित्रांची बैठक झाली त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले? त्या फोटोत सगळ्यात मोठा फोटो होता माझा. त्यांना माहीत आहे आपले नाणे चालणार नाही, त्यामुळे चालणारे नाणे घेतले पाहिजे. कारण त्यांचे नाणे खरे नाही, खणकन वाजत नाही हे लोक ओळखतील, म्हणून नको उगीच अडचण. लावून टाका त्या ठिकाणी फोटो, असे शरद पवार म्हणाले.
पांडुरंगाकडे बडवे येऊ देत नाहीत, असं भाषण काही लोकांनी केले. कसले बडवे, कसले काय. पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात, या राज्यात कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं नाही. आज वारीला लोक जातात. उन्हातान्हात जातात. अंतःकरणात एकच भावना असते पांडुरंगाचे दर्शन घ्यावे. पंढरपूरला गेल्यानंतर मंदिरातही जाता येत नाही. बाहेरूनच कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने परत जातात. पांडुरंग म्हणायचे, गुरु म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे सांगायचे.
आम्ही भाजपबरोबर गेलो, चुकले काय असे सांगितले गेले. नागलॅण्डमध्ये तुम्ही परवानगी दिली. पण नागालॅण्ड, मणिपूर तो संपूर्ण त्याच्या शेजारी चीन व पाकिस्तान हे देश आहेत. या देशांच्या सीमेवर जी छोटी राज्य आहेत त्या राज्यांबाबत अतिशय बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. शेजारच्या देशाने गैरफायदा घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागते. त्यामुळेच तिथे आपण बाहेरून पाठिंबा दिला.
शिवसेना आणि भाजपत मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा गांधींच्या पक्षाला पाठिंबा दिला. इंदिरा गांधींच्या काळातही शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज सांगतात तुम्ही शिवसेनेबरोबर गेला मग आम्ही भाजपबरोबर गेलो तर त्यात चूक काय? पण यात फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहे, भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हे चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, त्या विचाराच्या पंगतीला जाऊन बसणे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असा निर्देश शरद पवारांनी यावेळी दिला.