बीडमधील 'उमेदवारांची घोषणा' ही माझी चूक, पवारांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 03:16 PM2019-09-19T15:16:00+5:302019-09-19T15:29:16+5:30
पवारांच्या या घोषणेनंतर, पंकजा मुंडेंनी आपले मत व्यक्त केले. पवारसाहेबांचं बीडवर अधिक प्रेम राहिलंय,
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केली. यावेळी आष्टी सोडून इतर पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले. मात्र, पवारांनी घोषित केलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. बीडमधील उमेदवारांची घोषणा मी करणे हे चुकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलंय.
पवार यांनी बीडमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, परळी विधानसभा मतदार संघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी यावेळी घोषित केली. दरम्यान आष्टी मतदारसंघाचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाणार असल्येच पवार म्हणाले. ते बीडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.
पवारांच्या या घोषणेनंतर, पंकजा मुंडेंनी आपले मत व्यक्त केले. पवारसाहेबांचं बीडवर अधिक प्रेम राहिलंय, असा उपरोधात्मक टोलाही पंकजा यांनी लगावला. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये परळीतील लढत ही रोमांच वाढवणारी आहे. तर, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या निवडणुका आमच्यासाठी चॅलेंज आहेत. पण, मला वाईट वाटतं, त्यांना म्हणजे मेन कॅप्टनला येऊन तिंथं थांबायला लागतं, असे म्हणत बीडमधील उमेदवारांच्या घोषणेनंतर पंकजा यांनी शरद पवारांवर टीपण्णी केली. तसेच, जिल्ह्यातील नेतृत्वावर तेवढा विश्वास राहिला नसल्याचंही पंकजा यांनी म्हटले. राष्ट्रवादी हा बीड जिल्ह्यात ताकदवर पक्ष होता, तो शुन्यावर आलाय. त्यामुळे आता, जिल्ह्यातील नेतृत्वावर सगळा कारभार सोडता येणार नाही. तसेच, जिल्ह्यातील कोण कधी भाजपात प्रवेश करेल? याची धास्तीही राष्ट्रवादीने घेतलीय, असेही पंकजा यांनी म्हटले होते.
पवार यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नावर बोलताना, ती माझी चूक होती, असे म्हटले आहे. 'उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हवे होते. पण, लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले', असं शरद पवार यांनी म्हटले आहे. उमेदवार घोषित करणे हे प्रदेशाध्यक्षांचे काम असते. मात्र, तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आग्रह पाहून मीच उमेदवारांची घोषणा केल्याचं पवार यांनी सांगितलं.