पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या 50 पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं 71 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.
भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र, त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे. यासंदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपलं मत मांडलं आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पडळकर नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलंय. ''पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केलेलं आहे, त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार हेच एनडीएचे नेते असून तेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. बिहार निवडणूकांवेळी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळे, जरी भाजपाला अधिक जागा मिळाल्या तरी जे ठरलंय तसंच होईल. महाराष्ट्रातील निवडणुकांवेळी असं काहीही ठरलं नव्हतं. विशेष म्हणजे अनेकदा जाहीर संभांमध्येही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं घोषितही करण्यात आलं होतं. शिवसेना नेत्यांच्या समक्ष या सभा पार पडल्या होत्या,'' असेही पडळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन आपण सत्तेत याल का? या प्रश्नावर उत्तर देताना, पुलाखालून बरंच पाणी गेलंय, पण या विषयावर मी भाष्य करणे योग्य नाही, माझे नेते त्याबद्दल बोलतील, असेही पडळकर यांनी म्हटले.
संजय जायसवाल यांची भूमिका
भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं जायसवाल म्हणाले. आम्ही निवडणूक निकालाचा अभ्यास करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल प्रश्नच निर्माण होत नाही, असं जायसवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावे.
शब्द पाळला नाही, तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्यामुळेच आता बिहारमध्ये भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 'भाजपनं शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. जागा कमी जास्त आल्या तरीही मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र, ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं पलटवार केला. त्यामुळेच आता भाजप आपल्या मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळत आहे. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत,' असं राऊत यांनी म्हटलं.