Join us  

सत्ता येईल हे स्वप्नातही नव्हते - नितीन गडकरी

By admin | Published: October 24, 2015 1:52 AM

भारतीय जनता पार्टी आज सत्तेवर आहे; कारण अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी त्याची पायाभरणी करून ठेवली आहे. अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम सुरू केले

मुंबई : भारतीय जनता पार्टी आज सत्तेवर आहे; कारण अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी त्याची पायाभरणी करून ठेवली आहे. अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम सुरू केले तेव्हा कधी तरी सत्ता येईल हे स्वप्नातही नव्हते, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, नौकावहन आणि बंदर मंत्री नितीन गडकरी यांनी केले.सीबीडी फाउंडेशनच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित ‘अटलरत्न’ या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांची होती.नितीन गडकरी म्हणाले, देशसेवा आणि जनसेवा करण्याचे अटलजींनी दिलेले बाळकडू आम्ही कधीच विसरणार नाही. ‘अटलरत्न’ हा कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी अटलजींच्या वाढदिवशी दिल्लीत सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी कार्यक्रमात केली.डॉ. काकोडकर यांनी भाषणात अटलजींच्या अफाट स्मरणशक्तीचा एक नमुना वर्णन केला. ते म्हणाले, तो काळ काहीसा राजकीय अस्थिरतेचा होता. भारत अणुस्फोट करण्यास सज्ज आहे? अशी विचारणा अटलजींनी केली; आणि मी होकारार्थी प्रतिसाद दिला. लवकरच अटलजींचे तेरा महिन्यांचे सरकार सत्तेवरून दूर झाले. त्यानंतर निवडणुकीत अटलजी पुन्हा सत्तेवर आले. तोवर दीड वर्षाचा अवधी उलटला होता. मी त्यानंतर त्यांना भेटताच अटलजींनी ‘क्या हुआ’ असा प्रश्न केला आणि त्यानंतर घडलेल्या इतिहासामुळे भारत अणुसज्ज राष्ट्रांच्या पंगतीत दाखल झाला, असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)