...हे अच्छे नव्हे तर ‘बुरे दिन’ आले, भाजीपाला महागल्याने ग्राहक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:30 AM2017-10-24T02:30:37+5:302017-10-24T02:32:26+5:30
मुंबई : भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने दिवाळीनंतर मुंबईकरांचे दिवाळे निघाले आहे. वस्तू आणि सेवा कराच्या ओझ्याखाली दिवाळी खरेदी झाल्यानंतर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे कंबरडे मोडले आहे
मुंबई : भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने दिवाळीनंतर मुंबईकरांचे दिवाळे निघाले आहे. वस्तू आणि सेवा कराच्या ओझ्याखाली दिवाळी खरेदी झाल्यानंतर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. विशेषत: भाजीपाल्याने शंभरी गाठल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून, संतापही व्यक्त केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील भाजीबाजारात भाज्यांची आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती या दुपटी-तिपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्यांचे भाजी खरेदी करताना हाल होत आहेत. वाशी, नवी मुंबई, दादर येथील घाऊक बाजारातील भाजीपाला हा पुणे, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली या ठिकाणांहून आणला जातो. या भागांत अवकाळी पाऊस
पडल्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. तर काही भाजीपाला खराब होऊन नुकसान झाले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात अपुरा पुरवठा होत आहे.
तसेच इंधनाच्या वाढत्या दरांनीही भाज्यांच्या दरवाढीला हातभार लावल्याचे येथील विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. घाऊक बाजारपेठेतील भाजीपाला हा घाटकोपर, कुर्ला, लालबाग, गिरगाव, दक्षिण मुंबई, वांद्रे, मशीद येथील किरकोळ बाजारपेठेत आणला जातो. घाऊक बाजारपेठेचा परिणाम किरकोळ बाजारपेठेवर दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक संतप्त झालेले आहेत.
पुदीना, कडीपत्ता २० ते ३० रुपयांना मिळत आहे. कांद्याची पात ३० ते ४० रुपये आहे. घेवडा १२० ते १६० रुपये किलो, दुधीभोपळा ७० ते १०० रुपये किलो, आले ६० ते १०० रुपये किलो, लिंबू १० रुपये चार नग, शेपू, पालक २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगा ५० ते ६० किलो, रताळी ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकले जात
आहे.
भाज्यांचे दर वाढल्यामुळे विक्रेत्यांनादेखील त्याचा फटका बसत आहे. ग्राहक विक्रेत्यांकडे दरवाढीबाबत जाब विचारत आहेत. पण प्रत्यक्षात विक्रेत्यांची परिस्थितीही ग्राहकांसारखीच आहे, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
थंडीच्या हंगामानुसार हिरव्या मिरच्यांचे दर घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात १५ रुपयांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात मिरच्यांची विक्री प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांना होत असून, मागील आठवड्यात हा दर ९० ते १०० रुपये होता. तसेच आवकही घटल्याने मिरच्यांचे दर वाढले आहेत. या आठवड्यात घाऊक बाजारात केवळ २५ ट्रक दाखल झाले, इतरवेळी नेहमी ४०पेक्षा जास्त मिरचीचे ट्रक बाजारात येतात.
>थंडीच्या हंगामानुसार हिरव्या मिरच्यांचे दर घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात १५ रुपयांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात मिरच्यांची विक्री प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांना होत असून, मागील आठवड्यात हा दर ९० ते १०० रुपये होता. तसेच आवकही घटल्याने मिरच्यांचे दर वाढले आहेत. या आठवड्यात घाऊक बाजारात केवळ २५ ट्रक दाखल झाले, इतरवेळी नेहमी ४०पेक्षा जास्त मिरचीचे ट्रक बाजारात येतात.
>अवकाळी पावसामुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. काही भाजीपाला पावसामुळे कुजला आहे. भाज्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व कारणांमुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचे दर काही दिवस अशाच प्रकारे स्थिर राहणार आहेत.
- शंकर पिंगळे, माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
>हिरव्या पालेभाज्या व इतर भाजीपाला या गरजा आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती आवाक्यात ठेवणे सरकारचे काम आहे. जेणेकरून सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला परवडेल व भाजीपाला
खाऊ शकेल. महिन्याचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.
- सविता मालपाणी,
गृहिणी, घाटकोपर
भाजी घाऊक किंमत किरकोळ किंमत आठवड्यापूर्वीचे
दर (रुपयांत)
कांदे १५ ते २० २० ते ४० २० ते ३५
बटाटे १५ ते २० २० ते ३० १० ते २०
फ्लॉवर ३० ते ४० १४० ते १६० १२० ते १३०
टोमॅटो १० ते १५ ८० ते १०० ४० ते ६०
कोबी १५ ते ३० ७० ते ८० ५० ते ७०
काकडी ०५ ते १५ ४० ते ६० ५० ते ६०
शिमला मिरची ३० ते ४० ६० ते ८० ६० ते ८०
मिरची २५ ते ४० १०० ते १२० ८० ते १२०
सुरण २० ते ३० ६० ते ८० ६० ते ७०
भेंडी ३० ते ४० ८० ते १०० ७० ते ८०
मेथी १२ ते २० ३० ते ४० २० ते ३०
वांगी ३० ते ४० ८० ते १०० ७० ते ९०
तोंडली १० ते ३० ७० ते ९० ७० ते ८०
कोंथिबीर ७० ते ८० १०० ते १३० १०० ते १२०
कारले २० ते ४० १०० ते १२० ८० ते १००
गवार ३० ते ४० १५० ते १८० १४० ते १७०
लाल भोपळा २० ते ५० ६० ते ९० ५० ते ७०