मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची सातत्याने चर्चा होत असते. सोशल मीडियावरही या शपथविधी सोहळ्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येतं. भाजपा नेते किंवा महाविकास आघाडीतील काही नेतेही याबाबत सातत्याने खासगीत बोलत असतात. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज पुन्हा त्याच विषयावरुन अजित पवारांना चिमटा काढण्यात आला. त्यावर, अजित पवारांनीही स्पष्टचं भाष्य केलं.
अजित पवारांनी विधानसभेत बोलताना पहाटेच्या शपथविधीवरुन भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना स्पष्टचं सांगितलं. लोकांना सारखं ती शपथेची पहाट आठवते, पण त्यादिवशी सकाळी 8 वाजले होते, असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घेतलेल्या शपथविधीवरुन आपलं मत मांडलं. सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत टोला लगावला होता. त्यानंतर, उपमुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं. "मुनगंटीवारांना लगेच ती पहाट आठवते. त्यांना एक कळत नाही की त्या दिवशी पहाट नव्हती तर सकाळचे आठ वाजले होते. आता सकाळच्या आठला पहाट म्हणतात हे दुर्दैवी आहे.", असे अजित पवारांनी म्हणतात सभागृहात हशा पिकला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा गट एकत्र येऊन सरकार स्थापन झाले होते. महाराष्ट्राच्या जनतेची झोप पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्याने महाराष्ट्राच्या जनेतची झोपच उडवली. त्यानंतर, राज्यभर हा पहाटेचा शपथविधी म्हणून चर्चेत आला. त्यामुळेच, आजही फडणवीस-पवार यांच्या सरकारची चर्चा निघाल्यास, पहाटेचा शपथविधी असेच संबोधले जाते. मात्र, तो पहाटेचा शपथविधी नसून सकाळचे 8 वाजले होते, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.