लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावच्या बांगुरनगरमध्ये निधी मिश्राला प्रियकर राहुल यादवने ‘लग्नापूर्वी मला शेवटचे भेट’ असे सांगत बोलावले होते. त्यानंतर तिची हत्या करून त्याने स्वतः आत्महत्या केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे.
निधी ही मालाड पश्चिमला एका खासगी कंपनीत काम करीत असताना राहुलशी तिची ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र राहुल हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर चारकोप आणि कांदिवली पोलिसात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. ही बाब तिच्या घरच्यांचा समजल्याने त्यांचा लग्नाला विरोध होता. तसेच त्यांनी तिचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केला. येत्या मे महिन्यात तिचे लग्न होणार होते. ही बाब राहुलला समजली. त्यामुळे त्याने तिला शेवटचे भेटायला ये, असे सांगत बांगुरनगरमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर गोळी झाडून तिला ठार मारले व नंतर स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली. कांदिवली पश्चिमच्या पोईसर परिसरात त्याचे आई-वडील राहतात. मात्र राहुलचे फारसे घरी येणे-जाणे नव्हते.
गोळीबाराची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील घटनास्थळी धाव घेत सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला. राहुलने गावठी कट्टा कुठून आणला, याबाबत चौकशी सुरू असून या प्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.