गोपनियतेचा भंग गुन्हा प्रकरण; कोरोनामुळे मुंबईला येण्यास दाखवली असमर्थता
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासनाकडील अतिगोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी बजाविलेल्या समन्सला उत्तर देताना ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी यासंदर्भात दाखल गुन्ह्याच्या एफआयआरची प्रत आणि चौकशीसाठीची प्रश्नावली मागितली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत हैदराबाद येथील कार्यालय सोडून मुंबईला येण्यास त्यांनी अमर्थता दर्शविली.
माझ्याकडे करायच्या चौकशीबद्दल प्रश्नावली पाठविल्यास त्याबाबत सविस्तर माहिती देईन, असे शुक्ला यांनी तपास अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडील चौकशी लांबणीवर पडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बीकेसीमधील सायबर पोलिसांनी २६ मार्चला ऑफिशियल सिक्रेट ॲक्टअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलात प्रतिनियुक्तीवर असलेल्या, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त शुक्ला यांना चौकशीला हजर राहण्यासाठी सोमवारी समन्स बजाविले होते. २८ एप्रिलला सकाळी अकरा वाजता त्यांच्या यशोधन निवासस्थानी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या स्थितीत येणे अशक्य असल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले. तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन संबंधित गुन्ह्याची एफआयआर प्रत आणि आपल्याकडे विचारणा करण्यात येणाऱ्या प्रश्नाची यादी पाठवावी, त्याबाबत तातडीने माहिती देऊ, असे शुक्ला यांनी कळविल्याचे समजते.
शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना गेल्यावर्षी २५ ऑगस्टला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल काही व्यक्तींचे फोन टॅप करून त्यांनी अहवाल तयार केला होता. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दुसऱ्या दिवशी ताे गृह विभागाकडे सादर केला. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे तसेच शुक्ला यांनी शासनाची फसवणूक व अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून अहवाल फेटाळण्यात आला होता. या प्रकाराबद्दल शुक्ला यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कारवाई टळली होती. मात्र, तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २३ मार्चला उघड करून राज्य सरकारवर आरोप केले.
..........................