Join us  

GRP आयुक्तांनीच तक्रारींकडे दुर्लक्ष करत होर्डिंगला परवानगी दिली; खालिद यांची ‘SIT’ला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 5:51 AM

खालिद यांनी या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ला दिलेल्या जबाबात शिसवे यांनी या होर्डिंगच्या मोठ्या आकाराबाबत आलेल्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही आणि त्यांनी होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीही तपासली नाही, असा दावा केला.

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांनी या दुर्घटनेस ‘जीआरपी’चे आयुक्त रवींद्र शिसवे यांना जबाबदार धरले आहे. खालिद यांनी या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ला दिलेल्या जबाबात शिसवे यांनी या होर्डिंगच्या मोठ्या आकाराबाबत आलेल्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही आणि त्यांनी होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीही तपासली नाही, असा दावा केला.

यासंदर्भात शिसवे यांच्याकडे कार्यालयीन नोट पाठविल्याचेही तत्कालीन जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांनी ‘एसआयटी’ला सांगितले. मे महिन्यात घाटकोपर येथील पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाच्या मंजुरीशिवाय स्वत:हून होर्डिंग मंजूर करण्यात प्रशासकीय त्रुटी आणि अनियमितता ठेवल्याबद्दल खालिद यांना निलंबित करण्यात आले. ‘एसआयटी’समोर दिलेला खालिद यांचा जबाब घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी दाखल आरोपपत्राचा भाग आहे.

बदलीचे आदेश आल्याने...

१९ डिसेंबर २०२२ रोजी इगो मीडियाने सुधारित भाड्याचा आणि होर्डिंगचा आकार ३३,६०० चौरस फूट वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, बदलीचे आदेश आल्याने आणि होर्डिंगला परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय असल्याने येणारे आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवण्यास आपण सांगितले.

‘बीपीसीएल’ने पेट्रोलपंपासाठी वापर केलेल्या भूखंडावर इगो मीडियाने होर्डिंगसाठी जमीन खोदण्याच्या प्रमाणावर आक्षेप घेतला. कारण त्यामुळे पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संस्था परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणारे होते.

‘बीपीसीएल’ने खोदकाम थांबविण्याचे आणि खोदलेली जागा पुन्हा त्याच स्थितीत ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, ‘बीपीसीएल’चा आक्षेप निरर्थक ठरविण्यात आला.

होर्डिंग उभारल्यानंतर  नेते, एनजीओ यांनी होर्डिंगच्या आकारावर आक्षेप घेतला. पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती त्यांना होती, असे खालिद यांनी जबाबात म्हटले आहे. या तक्रारींवर शिसवे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप खालिद यांनी केला.

टॅग्स :मुंबई