मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी उलथापालथ राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधी होत असताना राष्ट्रवादीचे 10-12 आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, या आमदारांना कोणतीही कल्पना न देता त्यांना राजभवनावर नेण्यात आलं होतं अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.
''मला सकाळी साडेसहा-पावणेसातला एका सहकाऱ्याने टेलिफोन करून कळवले की आम्हाला येथे राजभवनला आणले गेले आहे. एवढ्या सकाळी मा. राज्यपाल बाकीचे सगळे कार्यकर्म सोडून तयार होते, महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता फारच वाढली याचा मला आनंद झाला. महिती घेतल्यावर कळलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काही सदस्य त्याठिकाणी गेले आहेत. नंतर टेलिव्हिजनवर पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.'', असं पवारांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटलंय. तसेच, पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी याबाबत माहिती दिली. प्रत्येक पक्षाने आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी करून त्यांच्या सह्या घेऊन आपल्याकडे घेऊन ठेवल्या होत्या. माझ्याकडेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या 54 सदस्यांची यादी आहे. पैकी दोन याद्या विधिमंडळाचा नेता म्हणून अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि आमचा असा अंदाज आहे की कदाचित त्यांनी त्या राज्यपालांना सादर केल्या असण्याची शक्यता आहे.त्या आधारावर राज्यपालांनी आकडा पूर्ण झाला असं समजून शपथ दिली असावी. असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमासाठी घेतलेल्या होत्या. त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. या 54 जणांचा पाठिंबा त्यांना आहे असं भासवलं आहे का याची मला खात्री नाही पण मला शंका आहे आणि तसं असेल तर तीसुद्धा माननीय राज्यपालांची फसवणूक झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदी बाहेर पडणाऱ्या सदस्यांना लागू होतात. त्यांचं सदस्यत्व जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात जनमत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही. सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल याचा मला विश्वास आहे, असे पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.