हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बॅंक वसुलीवाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:42+5:302021-08-01T04:06:42+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घरांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घरांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले त्यामुळे घरी शिल्लक असलेली जमापुंजीदेखील या काळात संपली आहे. असे असले तरी बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही थांबले नाहीत. हे हप्ते फेडण्यासाठी आता नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेकांना बँकांमधून दररोज फोन येत आहेत तर काही खासगी फायनान्स संस्थांमधील माणसेदेखील घरी येत आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते नेमके भरावे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोरोनाच्या काळात गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज व वाहन कर्जाचे हप्ते मोठ्या प्रमाणात थकल्याने नागरिकांच्या घरी वसुलीसाठी बॅंकांचा तगादा सुरू झाला आहे. यामुळे अनेकांवर मानसिक दडपण आले आहे.
सारीच कर्जे थकली; गृहकर्जाचे प्रमाण जास्त
कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये, वाहतूक आणि सर्व कार्यालये बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. यामुळे या काळात मुख्यतः गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज व वाहन कर्ज मोठ्या प्रमाणात थकले. परिणामी विद्यार्थ्यांना, वाहनचालकांना व घरमालकांना कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणात फोन येऊ लागले आहेत.
अनेकांकडे कर्ज वसुलीसाठी तागादा
कर्ज थकल्यामुळे कोरोनाच्या काळात बँकांकडून अनेकांना कर्ज वसुलीसाठी फोन येत आहेत. यात बँकांपेक्षा खासगी फायनान्स कंपन्या तसेच पतपेढ्यांकडून मोठ्या प्रमाणात तगादा लावण्यात येत आहे. अनेकदा फोनवरून दमदाटी करणे तसेच घरी वसुलीसाठी माणूस पाठविण्यासारखे प्रकारदेखील होत आहेत.
नोकरी गेली, गृहकर्ज थकले!
आदिनाथ पालवे - कोरोनाच्या काळात माझी नोकरी गेली. यामुळे घराचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. सुरुवातीच्या काळात बँकांनी सहकार्य केले मात्र दोन महिन्यानंतर बँकांकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाला. यासाठी घरातील सोने गहाण ठेवून झाले. तरीदेखील कर्जाचे हस्ते फेडण्याचा प्रश्न समोर उभा आहे.
कुमार गीते - वाहन कर्ज काढून मी एक प्रवासी गाडी खरेदी केली होती. लॉकडाऊनच्या काळात सर्व ठिकाणी बंदची परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे वाहतूकदेखील थांबली होती. ग्राहक नसल्याने गाडी एका जागी उभी राहिली होती. त्यामुळे उत्पन्न बंद झाले व कर्जाचे हप्तेदेखील थांबले. आता व्यवसाय सुरू झाला असला तरीदेखील कर्जाचा डोंगर समोर उभा आहे.
दुकान बंद पडले, कर्ज कसे भरणार?
आरिफ हुसैन - कर्ज काढून मॉलमध्ये एक छोटे दुकान सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या काळात मॉल बंद असल्याने माझ्याप्रमाणे अनेक छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले व नाइलाजाने दुकान बंद पडले. यामुळे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा राहिला आहे.
देवीदास तुळजापूरकर (सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन) - रिझर्व बँकेने कर्जाची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२२ पर्यंत बँक कर्जदारावर कोणतीही कारवाई करू शकत नाही. जर एखाद्या कर्जदारास कोणतीही बँक अथवा फायनान्स संस्था दमदाटी करणे तसेच कर्ज वसुलीसाठी घरी माणसे पाठवणे यासारखे प्रकार करत असल्यास याबद्दल पोलिसांत अथवा रिझर्व बँकेकडे तक्रार देणे गरजेचे आहे.