पक्षाला जाब विचारणे चुकीचे, 'तानाजी'च्या मॉर्फ व्हिडीओनंतर भाजपाचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 06:13 PM2020-01-21T18:13:54+5:302020-01-21T18:14:50+5:30
'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला! अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे निर्माण झालेला वाद नुकताच शमला होता. तोच तानाजी चित्रपटातील दृष्ये वापरून व्हायरल झालेल्या व्हिडीओचा वाद सुरू झाला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच संबंधि पक्षालाही त्यांनी सुनावलं होतं. त्यानंतर, भाजपाने या व्हिडीओचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी याबाबत पत्र जाहीर केलं आहे.
'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला! अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय', अशा शब्दांत संभाजीराजेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या नरेंद्र मोदींच्या तुलनेबाबतच्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला होता. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाने स्पष्टीकरण दिलंय.
तानाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, पाटील यांनी भाजपाच्यावतीने एक पत्रही जारी केलं आहे.
तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. pic.twitter.com/5TQ5b4K2NU
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 21, 2020