पीओपी मूर्तींवर बंदी आल्यास आमचे जगणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:10 AM2021-08-28T04:10:42+5:302021-08-28T04:10:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जनावर बंदीचा आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जनावर बंदीचा आदेश दिल्यानंतर आता याचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट रोजी या याचिकेची सुनावणी असणार आहे. त्यामुळे सर्व गणेश मूर्तिकारांचे या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र पीओपी मूर्तींवर पूर्णपणे बंदी आल्यास आमच्या व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसेल व आमचे जगणे अवघड होऊन जाईल, अशी भीती गणेश मूर्तिकारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे.
आधीच कोरोनामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींच्या उंचीच्या नियमामुळे दरवर्षी पेक्षा कमी व्यवसाय होणार असल्याने मूर्तिकार चिंतित आहेत. त्यातच एकाएकी बंदीचा निर्णय जाहीर झाल्यास मूर्तिकार पूर्णतः कोलमडून जाईल व त्याच्यावर उपासमारीची वेळ येईल असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अनेक घरे केवळ गणपती मूर्तींच्या व्यवसायावर चालतात. अशावेळी त्याठिकाणची व्यवसायाची पूर्ण साखळीच मोडली जाईल व त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ येईल, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
------
दत्ताराम पाटील (गणेशमूर्ती विक्रेते) - माझ्या मेहुण्याचा पेण येथे पीओपी गणेशमूर्तींचा कारखाना आहे. तेथे तयार झालेल्या मूर्तींची मी मुंबईत विक्री करतो. गणेशोत्सव या एका सणावरच आम्हा दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पीओपीवर बंदी आल्यास आमचे जगणे अवघड होईल.
हर्षद माळी (गणेशमूर्ती विक्रेते) - पीओपीची गणेशमूर्ती इतर मूर्तींपेक्षा स्वस्त असते. त्यामुळे सार्वजनिक मंडळ तसेच बहुतांश घरांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्तींची स्थापना होते. या व्यवसायावर आज हजारो कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे पीओपीवर बंदी न घालता यावर सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे.