चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:57 AM2018-10-08T07:57:49+5:302018-10-08T08:06:38+5:30
खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मुंबईत बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे मुबईतील राष्ट्रवादीच्या जागांसाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती फक्त आणि फक्त खासदार उदयनराजेंचीच.
खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे. मात्र, आता उदयनराजेंची चर्चा आहे ती त्यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे. त्यामुळेच, रविवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीतही सातारा लोकसभा मतदारसंघ आणि उदयनराजे याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कारण, या बैठकीनंतर पवार साहेबांचा निर्णय आपल्याला मान्य आहे. पण, इतरही पक्षात माझे मित्र आहेत, असा सूचक इशारा उदयनराजेंनी दिला आहे. तर काही दिवसांपूर्वीच फसवाफसवी करू नका असेही उदयनराजेंनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला साताऱ्यातून उदयनराजेंना पर्याय देण्याचा प्रयत्न आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीतर्फे रविवारी कल्याण, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, उस्मानाबाद, माढा, सातारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवारांसाठी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीनंतर चर्चा सुरू झाली ती केवळ उदयनराजे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची. दरम्यान, या बैठकीत एका गटाने उदयनराजेंच्या उमेदवारील विरोध दर्शवला आहे. तसेच रामराजे नाईक निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार देण्याची मागणी केली आहे.