इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ जाणणे सोपे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:55 AM2018-03-26T02:55:54+5:302018-03-26T02:55:54+5:30
शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा.
मुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत येणाºया भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश अॅप (उपयोजक) तयार केले आहे. शासन ‘शब्दकोश भाग - एक’ असे या मोबाइल अॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.
भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासन व्यवहारात व न्याय व्यवहारात वापरण्यात येणाºया इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानात होत असलेला बदल विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा या उद्देशाने भाषा संचालनालयाने, निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-१ हे भ्रमणध्वनी उपयोजक (अॅप) तयार केले आहे.
केंद्र व राज्य शासनाचे अधिनियमही उपलब्ध
शासन शब्दकोश मोबाइल अॅपमध्ये राज्य व केंद्र शासनाचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या ७५० शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे, ती डाऊनलोडसुद्धा करता येऊ शकते.
राज्याच्या भाषा संचालनालयाने मे १९७३ मध्ये पहिला ‘शासन व्यवहार कोश’ प्रकाशित केला, आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वापर रुजविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर नवे शब्द, नव्या परिभाषांनी व्यवहारातील मराठी किती तरी समृद्ध होत गेली. अनेक शासकीय शब्दांना या कोशाद्वारे नवे पर्यायी शब्द दिले जावेत, असा भाषा संचालनालयाचा प्रयत्न आहे.
अॅपची वैशिष्ट्ये
या अॅपची रचना अत्यंत सोपी आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनची आवश्यकता आहे. एकदा हे अॅप डाऊनलोड केले की इंटरनेटशिवाय कधीही, कुठेही आणि केव्हाही वापरता येणार आहे.
या अॅपमध्ये आपण आपल्या पसंतीचा शब्दकोश आणि त्यातील इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी असे शब्दांचे अर्थ सुलभपणे पाहू शकतो. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत स्वरूपात मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेता येईल.