मुंबई : राज्यात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात ५ आणि ६ नोव्हेंबर दरम्यान किमान तापमानात घट होईल. आणि हे किमान तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. तर मुंबईचे किमान तापमान २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी थंडीत आणखी वाढणार असून, पहाटेच्या गारव्यात या निमित्ताने भर पडणार आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सकाळचे तापमान कमी नोंदविण्यात येत आहे. दिवसाच्या तापमानात फार काही फरक पडलेला नाही. दिवसाचे तापमान जास्तच आहे. असे असले तरी मुंबईची पहाट धुक्यात हरवित असून, दिवसागणिक यात वाढ नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईला थंडीची चाहूल लागली असतानाच येथील प्रदूषणात देखील वाढ नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. १ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले असून, पवई आणि बोरीवलीसह उपनगरात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. तर बुधवारी मुंबईचे किमान तापमान २३.२ अंश नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर यात घट होणार आहे.