मुंबई : मुंबईचे शुक्रवारचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले असून अर्धा डिसेंबर संपला तरी मुंबई अजूनही थंडीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र मुंबईकरांची थंडीची प्रतीक्षा महिन्याच्या सरतेशेवटी संपणार आहे. कारण महिन्याच्या शेवटी म्हणजे नाताळ सुरु होतानाच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येईल. आणि मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत अद्यापही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. आता तर उत्तर भारत देखील गारठला आहे. मात्र मुंबई २१ अंशावरच आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले होते. मात्र तो काळ आणि डिसेंबर महिन्याचा सुरुवातीचा काही काळ वगळता मुंबईत किमान तापमान खाली घसरले नाही. कमाल तापमानाने मात्र कमाल केली असून, गेल्या काही दिवसांपापूर्वी कमाल तापमान चांगलेच खाली आले होते. परिणामी मुंबईत किंचित गारवा निर्माण झाला होता. मात्र पुन्हा प्रदूषणात झालेल्या वाढीने कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. उत्तर भारत कमालीचा गारठला असून, शीत वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागतील तेव्हा राज्याच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येईल.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यातील कमाल तापमानाशी तुलना करता किमान तापमान खाली उतरले नाही. हिवाळयासाठी आणखी वाट बघावी लागेल. डिसेंबरच्या शेवटी गारवा जाणवेल. डिसेंबर, जानेवारी, फेब्रूवारी महिन्यात किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त असेल. हे हंगाम निहाय आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १५ ते १६ अंशावर तापमान खाली येईल. मुंबईत डिसेंबर, जानेवारीत गारठा जाणवेल.