- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एकमताने मला देऊ केले, तरीही त्याचा मी स्वीकार करणार नाही. कारण, आता माझे वय झाले आहे. माझे लिखाणाचे कामही मंदावले आहे. त्यामुळे माझ्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा असली तरी मला अध्यक्षपद नको आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक म.सु. पाटील यांनी ‘लोकमत’कडे केले.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनाची तुलना ‘बैलबाजारा’शी केली होती. गेल्या काही वर्षांत राजकारण्यांचा संमेलनाच्या ठिकाणी वाढलेला वावर पाहता आणि संमेलनातील साहित्यिक चर्चांचा घसरलेला स्तर पाहता ती टीका अनाठायी नाही, असे उद्गार ‘मसुं’नी काढले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नागपूर येथील अक्षयकुमार काळे यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या वेळी कल्याण-डोंबिवलीमधील साहित्यिकांच्या वर्तुळातून पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, खुद्द पाटील यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रणधुमाळीत उतरण्यास साफ नकार दिला. आता संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक कशी रंग घेते याबद्दल कुतूहल आहे.नीरजानेही थोडे थांबावे‘मसु’ निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांची कन्या ज्येष्ठ स्त्रीवादी कवयित्री नीरजा यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची चर्चा होती. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, नीरजाने निवडणूक लढवावी व संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असे मी म्हणणार नाही. तिला अद्याप बराच साहित्यिक अनुभव घ्यायचा आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत प्रादेशिकता नकोसाहित्य संमेलनाचा जो कोणी अध्यक्ष निवडला जाईल, तो एकमताने निवडला जावा, असे आपले मत असल्याचे पाटील म्हणाले. साहित्यात कोणतेही वाद नसावेत. माझ्याबरोबर अध्यक्षपदासाठी अक्षयकुमार काळे यांचे नाव चर्चेत असल्याचे वाचनात आले. त्यांचे नाव मला अध्यक्षपदाकरिता योग्य वाटले म्हणून त्यांची निवड होणार नाही. त्यासाठीही प्रक्रिया आहे. मात्र, अध्यक्षनिवडीच्या प्रक्रियेत प्रादेशिकता नको, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.साहित्यिकाला मूल्यप्रणाली हवी : सूचकता हा साहित्याचा प्राण आहे. त्यामुळे साहित्यिकाला स्पष्ट बोलण्याची गरज नाही. सूचकतेत स्फोटकता असते. साहित्यिकाला मतप्रणालीपेक्षा मूल्यप्रणाली असल्याशिवाय लिहिता येत नाही. अध्यक्षीय भाषणात अनेक मुद्दे चर्चिले जातात, ठराव होतात. त्यांची कार्यवाही होत नसली तरी अध्यक्षाने साहित्याविषयी मांडलेला विचार दुय्यम ठरत नाही. त्याची किंमत कमी होत नाही, असे ते म्हणाले.राजकारण्यांचा वावर नकोसध्या संमेलने ज्या पद्धतीने सुरू आहेत, ती नकोशी वाटतात. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर जास्त असतो, असे नमूद करून पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सर्जनशील साहित्यिकांचाच वावर असावा. संमेलनात साहित्यावर चर्चा झाली पाहिजे. कराडच्या साहित्य संमेलनात राजकीय मंडळी पहिल्या रांगेत बसली होती. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा ताबा डी.वाय. पाटील यांनी घेतला होता. राजकारण्यांचा वावर टाळला गेला पाहिजे. अध्यक्षाला पूर्ण भाषण करू देत नाहीतआमच्या वेळेला संमेलनात केवळ साहित्यावर चर्चा होत होती. आता संमेलने उरकण्यावर जास्त भर असतो. अध्यक्षीय भाषणातही काटछाट करून बोलण्यास सांगितले जाते. त्यामुळे अध्यक्षाच्या अधिकारावर एक प्रकारे गदा येते. साहित्यावर तपशीलवार चर्चा झाली पाहिजे. पूर्वीच्या साहित्य संमेलनांत विभागवार चर्चा केली जात होती. वानगीदाखल सांगायचे तर काव्याच्या विभागात नवकविता व तत्सम विषयांवर चर्चा होत होती. ती ऐकायला बडी साहित्यिक मंडळी हजर असत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मागे साहित्य संमेलनाची तुलना बैलबाजाराशी केली होती. सध्याच्या साहित्य संमेलनांचे स्वरूप पाहता ती सर्वस्वी अनाठायी नाही, असेही पाटील म्हणाले. अक्षयकुमार काळे यांचे प्रतिस्पर्धी कोण? : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याकरिता पूर्वतयारी केलेले समीक्षक अक्षयकुमार काळे यांच्यासमोर निवडणूक लढण्यास बोलीभाषेचे अभ्यासक गणेश देवी यांनी नकार दिला असतानाच आता समीक्षक म.सु. पाटील यांनीही नकार दिल्याने आता काळे यांच्यासमोर कुणी उभे राहणार की तेच बिनविरोध अध्यक्ष होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.