मुंबई - विधानसभेत भाजप आमदारांसोबत तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांचा यापूर्वी वाद झाला. त्यावेळी, भाजच्या 12 आमदारांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. भास्कर जाधव हे आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि कडक शिस्तीमुळे विधानसभेत नेहमीच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा भास्कर जाधव तालिका अध्यक्षपदी असताना संतापल्याचे दिसून आले. यावेळी, त्यांनी भाजप आमदारांना चांगलंच खडसावलं. तसेच, हे अजिबात चालू देणार नाही, असेही ठणकावले.
अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विधानसभेत प्रत्येक पक्षाला अर्थसंकल्पावर किती वेळ बोलू द्यावं, यावर चर्चा सुरू होती. यावेळी तालिका सभापती असलेले भास्कर जाधव म्हणाले, आपण दोन-तीन दिवस चर्चा केली, पण अद्यापही वेळेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेची 29.69 मिनिटे शिवसेनेची वेळ शिल्लक आहे. तर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे 23.10 मिनिटे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 28.10 मिनिटे शिल्लक आहेत. भाजपचा एकही सेकंद शिल्लक नाही, मग आजचं वाटप कसं करायचं हे तुम्ही नेत्यांनी ठरवा. मग, त्यापद्धतीने चार्ट येऊ द्या, असे जाधव यांनी म्हटले.
तालिका अध्यक्षांनी वेळेची मर्यादा सांगितल्यानंतर भाजप आमदारांनी गोंधळ केला. त्यावेळी, भास्कर जाधव चांगलेच भडकले, माझ्यावर हेत्वारोप करायचा नाही, मी वॉर्निंग करतोय डॉक्टर, अजिबात चालणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी भाजप आमदारांना दिला. यावेळी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मध्यस्थी केली. अडीच तासाच्या चर्चेसाठी दीड तास सर्व पक्षांनी घ्यावे, एक तास उपमुख्यमंत्र्यांचा असेल, असे अनिल परब यांनी म्हटले.