Join us

राज्यात ४ दिवस पाऊस कोसळणार; गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:00 PM

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

मुंबई : केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वीच तीन दिवस अगोदर रविवारी दाखल झाला आहे. त्याच्या पुढील प्रवासाला हवामान अनुकूल असतानाच पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 

मुंबईतील तापमान ३४.५ अंशावर-

मुंबईचे कमाल तापमान रविवारी ३४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या कमाल तापमानात फार काही चढ- उतार नसले तरीदेखील आर्द्रता कमी अधिक होत असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा जाच कायम आहे. 

रविवारी सकाळी मुंबईचे हवामान किंचित ढगाळ नोंदविण्यात आले. शिवाय याच काळात वारा वेगाने वाहत असल्याची स्थिती होती. मात्र सकाळी अकरानंतर हवामानात बदल झाले आणि मुंबईकरांना उन्हाचा तडाखा  बसू लागला.

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रकोकण