अकरावी प्रवेश, बारावी मूल्यांकनाचे नियोजन नसताना शिक्षकांना महाविद्यलयात बोलावणे चुकीचे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:05 AM2021-06-17T04:05:58+5:302021-06-17T04:05:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळांप्रमाणे महाविद्यालयांच्याही ऑनलाईन शिकवण्या सुरू झाल्या असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतीतही काहीच निर्णय झालेला नाही. ...

It is wrong to call teachers in college without planning for 11th admission, 12th assessment ...! | अकरावी प्रवेश, बारावी मूल्यांकनाचे नियोजन नसताना शिक्षकांना महाविद्यलयात बोलावणे चुकीचे...!

अकरावी प्रवेश, बारावी मूल्यांकनाचे नियोजन नसताना शिक्षकांना महाविद्यलयात बोलावणे चुकीचे...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळांप्रमाणे महाविद्यालयांच्याही ऑनलाईन शिकवण्या सुरू झाल्या असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतीतही काहीच निर्णय झालेला नाही. बारावीच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युलाही अद्याप ठरलेला नसल्याने निकालाचे काम सुरू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना घरातूनच ऑनलाईन शिकविण्याची परवानगी कायम ठेवून त्यांना महाविद्यालयात बोलावून उपस्थितीची जबरदस्ती करू नये, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू होणार नसल्या तरी शाळांच्या प्रशासकीय कामासाठी आणि विशेषतः दहावी, बारावीच्या निकालांच्या कामासाठी शिक्षकांची शाळांतील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवरच शिक्षण संचालकांनी शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या शिक्षकांनी ५० टक्के उपस्थित राहावे, तर १०वी व १२वीच्या शिक्षकांनी १०० टक्के उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार निकालाचे काम सुरू झाले असले तरी अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावी निकालांसंदर्भात शिक्षण विभागाचे ठोस धोरण ठरलेले नाही. मग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना उपस्थितीची सक्ती करणे म्हणजे त्यांच्याविषयी अनास्था दाखविणारे आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांच्या प्रशासनाला दुय्यम लेखणारे, किंबहुना नगण्य समजणारे अशी प्रतिक्रिया कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सरचिटणीस प्रा मुकुंद आंधळकर यांनी दिली.

मुंबईतील कित्येक कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन अध्यापनासाठी पूर्ण तयारी केली आहे. ऑनलाईन तासिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशात मुंबई, ठाणे परिसरातील बहुतेक शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक हे दूर उपनगरांत राहणारे आहेत व ते रेल्वे, लोकलने प्रवास करतात. कित्येकांचे चार-पाच तास प्रवासात जातात. शिक्षकांना अद्याप रेल्वे, लोकलने प्रवास करण्याची परवानगी नाही मिळाली तरी शिक्षकांचा प्रवासाचा वेळ ध्यानी घेऊन त्यामध्ये बदल करावे लागतील आणि हे विद्यार्थी व शिक्षक दोघांचा वेळ घालविण्यासारखे होईल, असे मत शिक्षक मांडत आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षण सुरू असताना, विद्यार्थी शाळेत येत नसताना शिक्षकांना शाळा, महाविद्यालयांत बोलावून तेथून ऑनलाईन अध्यापन करायला लावणे हे अनाकलनीय असल्याचे मत आंधळकर यांनी मांडले.

आधी बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरवा

विद्यार्थ्यांना शिक्षक ऑनलाईन शिकवीत असताना बारावी निकालाचे कारण देऊन शिक्षकांच्या उपस्थितीचा घाट शिक्षण विभाग घालत असेल तर सुरुवातीला बारावीच्या निकालाचा मूल्यांकन पद्धतीचा फॉर्म्युला ठरवावे, धोरण निश्चित करावे आणि मग शिक्षकांना महाविद्यालयात बोलवावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक करीत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्र्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा व ऑनलाईन शिक्षण सुरू असेपर्यंत काही काम नसताना शिक्षकांना शाळा, महाविद्यालयांत बोलावू नये, अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे.

Web Title: It is wrong to call teachers in college without planning for 11th admission, 12th assessment ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.