Join us

ज्यांनी मोठं केलं, त्यांच्यावर टीका करणं चुकीचं- मनोहर जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 11:27 AM

ते सर्व आरोप मनोहर जोशींनी फेटाळून लावले आहेत.

मुंबईः शिवसेनेचे माजी नेते, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासे केले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिलं होते.  नारायण राणेंनी जोशींवर आत्मचरित्रातून गंभीर आरोप केल्याचं समोर आलं होतं. ते सर्व आरोप मनोहर जोशींनी फेटाळून लावले आहेत. राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचं जोशींकडून खंडन करण्यात आलं आहे. एका पक्षात 25 वर्षं काम केलं, त्याच पक्षाविरोधात बोलणं योग्य नाही, ज्यांनी मोठं केलं, त्यांच्यावरच टीका करणं योग्य नसल्याचा सल्लाही जोशींनी राणेंना दिला आहे.मला मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. बाळासाहेब ठाकरे एक आश्चर्यच होते. कुठल्याही सभेला बाळासाहेब मला घेऊन जायचे, त्यामुळेच माझे शत्रू निर्माण झाले. काही  शत्रू असतात, काही अतिरेकी असतात, असंही जोशी म्हणाले आहेत. राणेंच्या शिक्षणावर ते म्हणाले,  शिक्षणात माणसाचे आचार-विचार महत्त्वाचे असतात. राणेंच्या तोंडून हे मी प्रथमच ऐकतोय. राणेंच्या त्या आरोपांत कोणतंही तथ्य नसल्याचं जोशींनी स्पष्ट केलं आहे. राणेंनी आत्मचरित्रातून म्हटलं होतं की, माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं. नारायण राणेंनी जोशींवर असा आरोप केला होता, त्याचं जोशींकडून खंडन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहिणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली होती. तसेच टविट्च्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे सांगत नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेतच दिले होते. एक सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही प्रभावीपणे बजावली होती. तसेच शिवसेनेमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच महसूल तसेच उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तसेच ते भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

टॅग्स :नारायण राणे