इटालियन पर्यटक महिलेवर कॅबमध्ये बलात्कार, अनोळखी टुरिस्ट गाइडविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:51 AM2018-07-02T00:51:17+5:302018-07-02T00:51:29+5:30
मुंबई दर्शनास आलेल्या ३७ वर्षीय इटालियन महिलेवर टुरिस्ट गाइडकडून चालत्या कॅबमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी गाइडने इन्स्टाग्रामवर तिचा पाठलाग करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : मुंबई दर्शनास आलेल्या ३७ वर्षीय इटालियन महिलेवर टुरिस्ट गाइडकडून चालत्या कॅबमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी गाइडने इन्स्टाग्रामवर तिचा पाठलाग करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. भीतीने महिलेने मुंबई सोडली आणि नवी दिल्लीतील इटालियन दूतावासाकडे धाव घेतली. त्यांच्या मदतीने तिने कुलाबा पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी अनोळखी टुरिस्ट गाइडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांसह जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
मूळची इटलीची रहिवासी असलेली पर्यटक महिला भारत पाहण्यासाठी नोव्हेंबर २०१७ रोजी आली. त्यानंतर, काही दिवस ती बंगळूरमध्ये राहिली. पुढे मुंबई दर्शनासाठी ती ११ जून रोजी मुंबईत आली. दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये ती थांबली. १४ जून रोजी गेट वे आॅफ इंडियाकडे पर्यटनाचा आनंद घेत असताना, मुंबई दर्शनासाठीच्या खासगी बसेस तिच्या नजरेस पडल्या. तेथे विचारपूस करत असताना, आरोपीने तिला गाठले. तो टुरिस्ट गाइड असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. तिने त्याला होकार देताच, दोघांनीही खासगी बसने कुलाबा ते जुहू असा प्रवास केला.
जेव्हा ते जुहू येथे पोहोचले, तेव्हा टुरिस्ट गाइडने तिला जुहूत राहत असलेल्या अभिनेत्यांच्या घरांबाबत सांगितले. तिनेही बॉलीवूड अभिनेत्यांचे बंगले पाहण्यास संमती दर्शविली. त्यानंतर, ८.३० वाजताच्या सुमारास ते दोघे निघाले. अभिनेत्यांचे बंगले दाखविल्यानंतर गाइडने तिला हॉटेलपर्यंत सोडतो, असे सांगितले. त्यानुसार, कॅबने दोघांनी प्रवास सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर, गाइडने कॅबचालकास दारू विकत घेण्यासाठी कॅब थांबविण्यास सांगितली. दारू विकत घेतल्यानंतर ते दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाले. तेव्हा गाइडने तिला दारू पिण्यास जबरदस्ती केली व त्यानंतर तो तिच्याशी जवळीक साधू लागला. त्याने एका हाताने तिचे तोंड दाबून तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या दरम्यान तिने त्याचे फोटोही काढले.
रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कॅब दक्षिण मुंबईत पोहोचली.
तेव्हा गाइडने महिलेला मोबाइलमधील कोणास दाखविलेस, तर त्याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टुरिस्ट गाइडने इंस्टाग्रामवर महिलेला गाठले आणि तिचा पत्ता मागण्यास सुरुवात केली. अशात घाबरलेल्या महिलेने १८ जूनला मुंबई सोडली.
इटालियन दूतावासाच्या मदतीने तक्रार
२६ जूनला तिने नवी दिल्लीतील इटालियन दूतावासाकडे धाव घेत आरोपीच्या विकृतीला वाचा फोडली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार, तिने २८ जूनला कुलाबा पोलिसांकडे धाव घेतली. तिथे तिच्या तक्रारीवरून अनोळखी टुरिस्ट गाइडविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कुलाबा ते जुहू दरम्यान झाल्याने, या प्रकरणी कुलाबा आणि जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत. खासगी बसेस, तसेच टुरिस्ट गाइडकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.