मुंबई : एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात येईल. आयटीआयची स्थगित प्रवेशप्रक्रियाही सुरू हाेईल. आयटीआयच्या दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवर्गात, संस्थांच्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर हाेईल. आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी आवश्यक तेथे बदल करुन केलेला प्रवेश अर्ज खुल्या प्रवर्गातून जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात येईल असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. ४ डिसेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस मिळेल आणि ५ ते ८ डिसेंबरदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही करायची आहे. ५ ते १५ डिसेंबरदरम्यान प्रवेशाची तिसरी व चौथी फेरी हाेईल. राज्यात आयटीआयच्या एकूण जागांपैकी एसईबीसीसाठी १३,८९० जागा होत्या. पहिल्या फेरीदरम्यान या जगांसाठी १३०७९ अर्ज प्राप्त आले, मात्र २०५४ जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली होती. आता उर्वरित ११८३६ जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार असल्या तरी निश्चित प्रवेशही कायम राहतील.