आयटीआयचे धडे ऑनलाईन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:59 PM2020-04-05T16:59:08+5:302020-04-05T16:59:48+5:30
आतापर्यंत ६६ हुन अधिक लेक्चर्स आणि ५ हजाराहून अधिक सबस्कायबर्स
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक महाविद्यालये , विद्यापीठांनी आता ई लर्निंगचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे आता राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानेही आता कंबर कसली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु केले आहे. या माध्यमातून आयटीआयचे विद्यार्थी आता ई लर्निंगचा अनुभव घेणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी हे चॅनेल सबस्क्राईब केल्यावर त्यांना घरातूनच धडे गिरविता येणे शक्य होणार आहे. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे शैक्षणिक हित जपून नुकसान होऊ न देणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ई लर्निंग अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी संचालनालयाने ‘डीव्हीईटी ई लर्निंग’ नावाने स्वतः चे यूट्यूब चॅनेल तयार केले आहे. आयटीआयमधील प्रत्येक शिक्षकाने आपापल्या ट्रेडमधील विषयांच्या पाठांचे व्हिडिओ बनवून ते संचालनालयाकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर ते व्हिडिओ संचालनालयाकडून यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात येणार आहेत. यामध्ये ई लेक्चर, सेमिनार, गेस्ट लेक्चर यांचा समावेश असणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्य अवगत करणे शक्य होणार आहे.
या व्हिडिओमध्ये शिक्षकांना विषयाच्या अनुरूप इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेचा वापर करता येणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अधिकच सुलभ असणार आहेत. व्हिडीओ अभ्यासक्रमाशी संबंधित असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. आतापर्यंत संचालनालयाकडून ‘डीव्हीईटी ई लर्निंग’ या यूट्यूब चॅनेलवर विविध ट्रेडचे ६६ पेक्षा जास्त व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. तर हे चॅनेल अवघ्या काही दिवसांत पाच हजारपेक्षा अधिक जणांनी सबस्क्राईब केले आहे. या यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात येणाऱ्या व्हिडीओंवर संबंधित कोर्सचे नाव आणि त्यानंतर पाठाचे नाव देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला हवा असलेला व्हिडीओ शोधणे सहज शक्य होणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.