आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:06 AM2021-07-17T04:06:28+5:302021-07-17T04:06:28+5:30

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक : कंपन्यांसोबत सामंजस्य करार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक ...

ITI students will get on-job training | आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग

googlenewsNext

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक : कंपन्यांसोबत सामंजस्य करार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या सुमारे दहा हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिमेन्स आणि टाटा स्ट्राइव्हचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड व ठाणे या १० जिल्ह्यांतील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आयटीआयना नजीकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांचे तर आयटीआयचा अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटीशिपची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करण्यासाठी सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले.

जर्मन ड्युएल सीस्टिम ऑफ ट्रेनिंग या मॉडेलअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर, रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले. आयटीआयमधील पायाभूत सुविधा व प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याचेही मलिक यांनी सांगितले.

औंध आयटीआयमध्ये अद्ययावत वेल्डिंग वर्कशॉप

या कार्यक्रमात बांधकाम यंत्रसामुग्री आणि उद्वाहन (इलेव्हेटर्स) निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी थायसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेतही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून १ कोटी ८० लाख रुपये निधीतून औंध (जि.पुणे) येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वेल्डिंग वर्कशॉप उभारण्यात येणार आहे. यासाठी थायसेनकृप इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी पुलकीत गोयल आणि सुनील सगणे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.

Web Title: ITI students will get on-job training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.