आयटीआय संस्थांचा चेहरा-मोहरा बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 05:59 AM2020-01-24T05:59:18+5:302020-01-24T05:59:42+5:30
औद्योगिक क्षेत्रात वाढलेले डिजीटलायझेशन, आॅटोमेशन, दररोज विकसित होणारे तंत्रज्ञान, जागतिक उद्योगाची आजची गरज लक्षात घेऊन राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षणात मूलभूत बदल करण्यात येणार
मुंबई : औद्योगिक क्षेत्रात वाढलेले डिजीटलायझेशन, आॅटोमेशन, दररोज विकसित होणारे तंत्रज्ञान, जागतिक उद्योगाची आजची गरज लक्षात घेऊन राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षणात मूलभूत बदल करण्यात येणार असून तीन वर्षात ‘आयटीआय कौशल्यविकास’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व ‘आयटीआय’ संस्थांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. यासाठी बारा टक्के निधी शासनाच्या कौशल्यविकास कार्यक्रमाद्वारे तर उर्वरीत ८८ टक्के निधी खाजगी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व प्रशिक्षणसेवेद्वारे उपलब्ध होईल.
सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासदार शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयटीआय प्रशिक्षण कौशल्यवृद्धीच्या या कार्यक्रमात एव्हीएशन, थ्रीडी प्रिंटींग, रोबोटीक वेल्डींग, डिझायनिंग इंजिनियरिंग, आॅटो इलेक्ट्रीकल, कृषी इंजिनियरिंग आदी प्रशिक्षणाचाही समावेश असल्याने याचा उपयोग उद्योगांसह कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रांनाही होणार आहे.
कृषी आयटीआय ही नवीन संकल्पना यानिमित्ताने पुढे आली असून राज्याच्या विविध विभागात टप्प्याटप्याने अॅग्रीकल्चर इंजिनियरिंग इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग राज्यातील ग्रामीण तरुणांना होईल.