लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होऊन २० दिवस उलटले तरी पदवी प्रमाणपत्रे छापून न आल्याने दीड लाख विद्यार्थी या प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत.
पदवीदान समारंभ ७ फेब्रुवारीला झाला. या समारंभानंतर दोन ते तीन दिवसांत पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयांना पाठविली जातात. त्यानंतर महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे पदवीदान समारंभाचे आयोजन करून त्यांचे वाटप करतात. परंतु, विद्यापीठाकडून अद्यापही प्रमाणपत्रे न आल्याने विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.
कॉलेजांचा पदवीदान समारंभ रखडलामुंबई विद्यापीठाच्या एप्रिल, २०२३ आणि ऑक्टोबर, २०२४ मध्ये पार पडलेल्या विविध परीक्षांच्या मिळून दीड लाख विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांची छपाई रखडली आहे. प्रमाणपत्रे न आल्याने महाविद्यालयांतील पदवीदान समारंभही रखडला आहे.
विद्यार्थ्यांची अडचणअनेक विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षण घ्यायचे असल्यास या प्रमाणपत्रांची गरज लागते. तसेच, भारतात अन्य विद्यापीठांत वा राज्यात शिकायचे असल्यासही या प्रमाणपत्राची गरज लागते. परंतु, निकाल जाहीर होऊन सात ते आठ महिने उलटले तरी प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडला की, दोन ते तीन दिवसांत पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयांकडे पाठविली जातात. मात्र, २० दिवस उलटले तरी प्रमाणपत्र पाठविण्यात आलेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडते.- संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य, मुंबई विद्यापीठ
पदवीदान समारंभात केवळ पदकप्राप्त आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांनाच पदवी प्रमाणपत्रांचे वाटप होते. अन्य विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवसांनी पदवी प्रमाणपत्रे पाठविली जातात. छपाईचे काम सुरू आहे. आठवडाभरात ही प्रमाणपत्रे कॉलेजांना मिळतील.- विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क), मुंबई विद्यापीठ