५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...
By सचिन लुंगसे | Published: August 3, 2023 06:07 AM2023-08-03T06:07:50+5:302023-08-03T06:08:23+5:30
म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे.
मुंबई : आमचे आई-बाबा सायनच्या संक्रमण शिबिरात आले होते. आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो. आता आमची मुलं काही वर्षांनी आमच्या बरोबरीला येतील. एक पिढी तर येथेच देवाघरी गेली. पन्नास वर्षे झाली. पण आम्हाला आमच्या गिरगावच्या नव्या इमारतीमध्ये म्हाडा घर देत नाही. खासगी विकासकाने नवी इमारत बांधून केव्हाच उभी केली. म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी पाडण्यात आलेली गिरगाव येथील इमारत म्हाडाने खासगी कंत्राटदाराकडून बांधली. मात्र, सायन प्रतीक्षानगरातील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना घराचा ताबा मिळाला नाही. उलट नव्याने बांधलेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तीन कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागत असतील आणि तरीही रहिवाशांना ताबा मिळत नसेल तर हा सगळा पैसा नेमका कुठे जात आहे? असाही सवाल गणेश शिंदे यांनी केला.
रहिवाशांना यातना
- गेल्या ५० वर्षांत इमारतीमधील जवळपास सर्वच रहिवासी मृत्यू पावले. काही महिन्यांपूर्वी इमारतीचे अध्यक्ष माचिंद्र पुजारी यांचाही मृत्यू झाला.
- प्रशांत यादव यांच्या
वडिलांचेही निधन झाले.
- माया शिंदे व इंदुमती पवार यांच्या पतीचे निधन झाले आहे. या दोन्ही महिलांची मुले अपंग आहेत. त्यामुळे म्हाडाच्या चकरा मारणे शक्य नाही.
घरे रिकामी का केली ?
सायन येथील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या ६ रहिवाशांनी आपली घरे रिकामी केली आहेत. म्हाडाकडून गिरगाव येथील घरांचे ताबा प्रमाणपत्र आणि चावी घेतली आहे. मात्र, इमारतीच्या ड्रेनेज लाइनसह दुरुस्तीचे काम बाकी असल्याने त्यांना नव्या घरात प्रवेश करता येत नाही.
चावी का घेतली ?
नव्या घराचा ताबा घेण्यासाठी संक्रमण शिबिरातील घर रिकामे करावे लागते. ताबा प्रमाणपत्र, चावी घेण्यासाठी विलंब झाला असता. त्याच दरम्यान कोणाचा मृत्यू झाला तर सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागते. म्हणून ताबा प्रमाणपत्र घेण्यात आले, असे रहिवासी सांगतात.
१९७४ ते २०२३ लढा चालूच
- १९७४ : गिरगाव येथील इमारत म्हाडाकडून धोकादायक म्हणून खाली करून पाडण्यात आली.
- २००८ : म्हाडाकडून टेंडर काढून सतीश कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आले.
- इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले.
- इमारत बांधून १५ पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली.
- म्हाडाचे दुर्लक्ष झाल्याने बांधकाम चुकीचे झाले.
- इमारतीचे प्रवेशद्वार फक्त साडेपाच फुटाचे बनवले.
- म्हाडाच्या जाचक अटीमुळे स्थलांतर
मिळाले नाही.
- २०१८ : विनोद घोसाळकर हे म्हाडाचे सभापती असताना म्हाडाकडून इमारतीमधील उपलब्ध रहिवाशांची ऑनलाइन सोडत काढण्यात आली.
- २०१८ : ३९ रहिवाशांची लॉटरी काढली.
- २०१९ : म्हाडा कार्यालयात मुळ कागदपत्रे जमा करण्यात आली. देकार पत्रे देण्यात आली.
- २०२१ : सहा रहिवाशांना ताबा दिला. मात्र इमारत अर्धवट दिल्याने राहण्यास जाता आले नाही.
- २०२२ : पुढे काहीच झाले नाही...