अहवालाला ९ महिने झाले, बाइक टॅक्सी का सुरू होईना? गाडी कुठे अडली; रिक्षा संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:31 AM2023-12-18T08:31:19+5:302023-12-18T08:31:35+5:30
बाइक टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडोबाबत धोरण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल सेवानिवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा समितीने मार्च महिन्यात सरकारला सादर केला होता. त्याला नऊ महिने उलटले. मात्र, तरीही अद्याप बाइक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय झालेला नाही. बाइक टॅक्सीला परवानगी देण्यास रिक्षा संघटनांनी विरोध दर्शविला असला, तरी राज्यात आवश्यक त्या ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्याबाबत प्रशासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद होता.
बाइक टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडोबाबत धोरण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यात परिवहनेतर संवर्गातील वाहनांची (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करण्यासाठी, तसेच त्यांना एग्रिगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, याचाही अभ्यास करण्यात आला. या वाहनांमुळे इतर वाहनांच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. समितीने त्याबाबत धोरण ठरविण्यासाठी रिक्षा संघटनांचे आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यानंतर, कोणत्या मुद्द्यावर बाइक टॅक्सीला परवानगी द्यायची, यासाठी अटी आणि शर्थी ठरविण्यासाठीच्या शिफारसींचा अहवाल समितीने मार्च महिन्यात राज्य सरकारला दिला.
तत्पर सेवा, कमी खर्च
एका व्यक्तीला प्रवास करायचा असेल, तर बाइक टॅक्सीचे भाडे कमी आहे. बाइक टॅक्सी ही रिक्षा किंवा टॅक्सीच्या तुलनेत कमी जागा व्यापते.
बाइक टॅक्सी थेट दारात येईल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. तत्पर सेवा मिळेल, तसेच प्रवाशाला कमी वेळेत पोहोचता येईल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कुठे परवानगी मिळणार?
राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीच्या अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते, अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे.
‘हे’ नियम
बाइक टॅक्सीला रिक्षाचे नियम लागू असतील. परिवहन संवर्गात नोंदणी
पिवळी नंबरप्लेट
गाडीचा विशिष्ट रंग ठरविला जाणार
वाहन चालकाला बॅचची सक्ती
पोलिस पडताळणीत पात्र ठरला
तरच बॅच