- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईफ्रेन्शिलाची हत्या करणाऱ्या क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) याच्या मनात तिच्या आईबद्दल सात वर्षांपासून राग होता. क्लेअरन्सच्या लग्नात वधू-वराने कोणत्या दिशेला बसायचे यावरून दोन कुटुंबांत वाद झाला होता. त्यानंतरही मेहुणी शेलीसोबत होत असलेल्या भांडणाचा सूड उगवण्यासाठी फ्रेन्शिलाचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.मयत फ्रेन्शिलाची आई शेली यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह सात वर्षांपूर्वी क्लेअरन्स फ्रान्सेका याच्यासोबत झालेला आहे. क्लेअरन्स याचे मात्र हे दुसरे लग्न असून त्यापूर्वी मुस्लीम धर्माच्या मुलीसोबत त्याचा प्रेमविवाह झालेला होता. यावेळी त्याने धर्मांतर देखील केले होते असेही समजते. मात्र अवघ्या सहा महिन्यांतच त्यांच्यात घटस्फोट झाल्याने ते वेगळे झाले होते. त्यानंतर शेली यांच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवून त्याने दुसऱ्यांदा प्रेमविवाह केलेला. दोन्ही कुटुंबे ख्रिश्चन धर्मिय असल्याने त्यांच्या लग्नाला संमतीही मिळालेली. परंतु लग्नाच्या दिवशी वधू-वराने कोणत्या दिशेला तोंड करायचे यावरून दोन कुटुंबांत वाद झालेला. त्यावेळी फ्रेन्शिलाची आई शेली यांच्याकडून झालेला घोर अपमान सहन झाला नव्हता, अशी कबुलीही क्लेअरन्स याने पोलिसांना दिली आहे. यावरून शेली यांच्याबद्दल मनात राग घुसमटत असतानाच मे महिन्यात त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. बहिणीच्या पाच महिन्यांच्या मुलाला पाहण्यासाठी शेली या फ्रेन्शिला व तिच्या लहान भावाला घेऊन क्लेअरन्सच्या मिरा रोड येथील घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी क्लेअरन्सच्या ६ वर्षांच्या मुलाला स्वयंपाकखोलीतून दूध आणायला सांगितले होते. परंतु लहान मुलाला काम सांगितल्यावरून क्लेअरन्सची आई (बहिणीची सासू) व शेली यांच्यात वाद झालेला. तसेच क्लेअरन्सनेही माझा मुलगा तुझा नोकर नाही, असे बोल शेली यांना सुनावले होते. त्यावरून दोघेही एकमेकांच्या मरणावर येऊन ठेपले होते. परंतु यानंतर शेली यांना धडा शिकवण्याची सूडभावना त्याच्या मनात होती.याची संधी त्याने २९ जून रोजी फ्रेन्शिलाचे वडील विदेशात व शेली यांची प्रकृती ठीक नसल्याच्या निमित्ताने साधली. संध्याकाळी ६ वाजता स्कूल बसमधून उतरून फ्रेन्शिला सोसायटीत जात असताना भिंतीआडून त्याने आवाज देऊन तिला बाहेर बोलावले. त्यानंतर फूस लावून सोबत नेल्यानंतर घोडबंदर रस्त्यावर एकांतात तिची गळा दाबून हत्या केली. सूडाच्या भावनेने पेटलेल्या क्लेअरन्सने यादरम्यान कसलाही पुरावा मागे राहणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. फ्रेन्शिलाच्या काही मित्रांनी लाल रंगाचा गाडी सांगितल्याने तपासात उशीर झाला.
सात वर्षांपासून होता मनात राग
By admin | Published: July 12, 2015 12:53 AM