...जगणे कठीण होत आहे!
By admin | Published: September 13, 2015 03:58 AM2015-09-13T03:58:24+5:302015-09-13T03:58:24+5:30
तरुण मुलंमुली सदान्कदा व्हॉट्सअॅपवर पडलेली असतात. निर्बुद्धपणे गोष्टी फॉर्वर्ड करीत राहणं हाच एककलमी उद्योग असतो. त्यात राजकारणावरचेही बरेच असताच. वाचन म्हणजे
- प्रा़ दीपक पवार
तरुण मुलंमुली सदान्कदा व्हॉट्सअॅपवर पडलेली असतात. निर्बुद्धपणे गोष्टी फॉर्वर्ड करीत राहणं हाच एककलमी उद्योग असतो. त्यात राजकारणावरचेही बरेच असताच. वाचन म्हणजे असे मेसेजेस जमतील तितके वाचणं असा अर्थ होऊन बसला आहे. मोबाइलचा बॅलन्स संपलाय, रिचार्ज करायचाय, सिम बदलायचंय हे जगण्यातले परवलीचे शब्द झालेत. माणसं कुठेही प्रवास करताना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. त्यांचं शेजारपाजारच्यांशी, मित्रमैत्रिणींशी बोलणं जवळपास संपलंय. सतत स्वत:चे, इतरांचे फोटो काढून ते आॅनलाइन टाकत राहणं गरजेचं झाल्यासारखं वागतात लोक. पण हेच आपल्यासमोर काही वाईट घडत असेल तर हस्तक्षेप करणार नाहीत, कारण त्याची भीती वाटते. सगळी कृतिशीलता बहुतेकांच्या बाबतीत फेसबुकच्या लाइक, कमेंट, शेअरपुरती मर्यादित होऊन बसलीय. भीती वाटावी असं हे एकाकीपण आहे-गर्दीत असताना सुद्धा !
कुर्ला ते विद्यानगरी असा शेअर रिक्षाने प्रवास करीत होतो. सोबतचे दोघे दहीहंडी उत्सवाबद्दल बोलत होते. ठाण्यातले असावेत. प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड त्यांचे वर्गमित्र असावेत, अशा पद्धतीने चर्चा चालू होती. दहीहंडीला कोण सेलीब्रिटी आला याची चर्चा चालू होती. त्यांच्यालेखी आदित्य पंचोली हासुद्धा सेलीब्रिटी होता. (खरंतर त्याला बोलावल्याबद्दल त्यानेच आयोजकांना पैसे दिले पाहिजेत, एवढा तो प्रसिद्ध आहे!) दहीहंडीला डीजेचा ढणढणाट होतो, लोक कावून जातात, राज्य दुष्काळात होरपळत असताना पाण्याचा असा गैरवापर करणे हे निलाजरेपणाचं आहे वगैरे गोष्टींशी त्यांना फार म्हणजे खरंतर काहीच घणंदेणं नव्हतं. आणि तसं ते बहुदा नसतं. ठाण्यात आव्हाडांची दहीहंडी रद्द झाली म्हणून आनंद व्यक्त करायला आलेल्या लोकांची संख्या पंचवीसच्या वर नव्हती. पण तेच आव्हाड जेव्हा दहीहंडीच्या खांद्यावर उभे राहून सत्ता, प्रसिद्धी आणि गुर्मीचे थर चढत होते तेव्हा त्यांना साथ द्यायला दुनियाभरचे चीअरलीडर्स गोळा झाले होते. यंदा आव्हाडांचं मन दुष्काळाने पाझरलं की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं परिशीलन करण्यासाठी त्यांना अधिक वेळ हवा होता, ते कळलं नाही. पण त्यांना सुचलं ते भाजपावाल्यांना सुचलं नाही. अर्थात तेही बरोबरच आहे. सत्तेत आल्यानंतरची पहिलीच दहीहंडी. मग घागर उताणी न करून कसं चालेल? त्यामुळे आशिष शेलार वगैरे मंडळींनी सत्तेचा दुष्काळ भरून काढण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. उत्तरोत्तर त्यांना इच्छित कार्यात यश येईल, असं गृहीत धरू या. शेवटी सत्ता महत्त्वाची. लोकांना उपकृत करणं महत्त्वाचं. कायदा, सुव्यवस्थेचा काय एवढा बाऊ करायचा?
आमच्या भागातले आमदार ६० हजार स्त्रियांकडून राख्या बांधून घेणार होते. एक लाख लोकांना ते विनामूल्य कुंभमेळ्याला नेणार आहेत. गेल्या वेळी त्यांनी असंच शिर्डीला नेलं होतं. लोकही जातात टी-शर्ट फुकट मिळतात म्हणून, जेवायला मिळतं म्हणून. यात जाणाऱ्यांच्या घरी खाण्याचे वांधे असतात असं नाही. पण मागायची सवय सुटत नाही आपल्या लोकांची. लोक विकत घ्यायला उभे आहेत आणि आम्ही नागरिक म्हणून विकले जायला तयार आहोत. कोण किती बोली लावतंय एवढं विचारायचं तेवढं राहिलंय. त्यासाठी निवडणुका आहेत की. आमची चाळीस मतं आहेत, अमुक अमुक एवढे देताहेत, तुम्ही किती देताय बोला़ आमचं वर्षभराचं केबलचं बिल भरा, मेन्टेनन्स भरा. आमच्या वाडीच्या, सोसायटीच्या मंदिराचा (गरज नसली तरी) जीर्णोद्धार करून द्या. धाब्यावर आम्हाला नॉनव्हेज आणि खंब्याची सोयी करा... या आणि अशा शेकडो मागण्या. आणि एवढं करून आमचं मतदान पन्नास टक्क्यांच्या वर नाहीच. मग या महान देशाचे बाकीचे सुजाण नागरिक जातात कुठे? पर्यटनासाठी! लोकशाहीला शिव्या घालत, पण तिचे सर्व फायदे बळकावत आमचा लब्धप्रतिष्ठितांचा वर्ग गाव उंडारायला जातो. पुन्हा उगवतो तो मेणबत्त्या घेऊन न चुरगळलेले कपडे घालून फिरायचं असतं तेव्हा. हा सगळा वर्ग आंग्लाळलेला आणि सर्वसामान्यांबद्दल कमालीची तुच्छता बाळगणारा. आपण चुकून या देशात जन्मलो, याबद्दल खंत बाळगणारा. यांच्या खिशात पैसा खुळखुळत असतो. त्यातनं वस्तू आणि विचार दोन्हीही विकत घेता येईल, या ठाम खात्रीवर हे लोक जगतात. आणि बहुतेकदा त्यांना ते जमतंच.
तरुण मुलं-मुली व्हॉट्सअॅपवर निर्बुद्धपणे गोष्टी फॉर्वर्ड करीत राहणं हाच एककलमी उद्योग असतो. त्यात राजकारणावरचेही बरेच असताच. गावं, शहरं दादा, भाऊ, ताई, साहेब, एकच आवाज, नाद नाही करायचा अशा बॅनर्सनी भरून गेलेत. तुमच्यासाठी कायपण, कधीपण, कुठेपण असं लिहिलेल्या स्त्रियांचे फोटो असलेल्या जाहिराती येतात आणि त्या लावणाऱ्यांना आपण काही गैर करतोय असं अजिबात वाटत नाही. विविध मनोरंजन वाहिन्यांवर प्रेक्षकांचा अंत पाहणाऱ्या उथळ मालिका वर्षानुवर्षे चालू राहतात आणि घरातल्या माणसांशी बोलायचं सोडून बायका भाजी निवडत आणि पुरुष पेपर वाचत वाचत या मालिका चघळतात.
या मालिकांतल्या बायकांची मंगळसूत्रं जशी असतात तशी मंगळसूत्रं घेण्यासाठी बायकांची रीघ लागते. रिअॅलिटी शो कार्यक्रमांमध्ये उठवळपणाचा पाऊस पडलेला असतो, पण त्यांना टीआरपीही भरपूर असतो. याउलट गिरीश आणि उमेश कुलकर्णीचा चित्रपट माध्यमाची ताकद बदलणारा सिनेमा येतो आणि पहिल्याच आठवड्यात कोसळतो. म्हणजे लोकांना डोक्याला शीण देणारं, विचार करायला लावणारं काही नकोच आहे का? फेसबुक आणि ट्विटरवर लोक जेवढी अस्पृश्यता पाळतात तेवढी कदाचित रोजच्या आयुष्यातही पाळत नसतील. म्हणजे हे सगळं नवं तंत्रज्ञान आपण काही नवं शिकण्यासाठी करतोय की आपले आधीचे पूर्वग्रह घट्ट करण्यासाठी करतोय? म्हणजे आपलं माणूस म्हणून उत्क्रांत होणं हा भ्रम आहे का, हेच समजत नाही. काळ कठीण आला आहे. डोळे सताड उघडे ठेवूनही काही दिसेल याची शाश्वती नाही. त्यामुळे नारायण सुर्वे यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘दररोज स्वत:ला धीर देत जगणे कठीण होत आहे.’