Join us

रस्त्यात ‘नपुंसक’ म्हटल्याने शरम वाटणे नैसर्गिक; पत्नीची हत्या करणाऱ्या पतीच्या जन्मठेपेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 7:42 AM

आरोपीची पत्नी भर रस्त्यात आरोपीला ‘नपुंसक’ म्हणाली. असे लेबल लावल्यावर कोणत्याही पतीला शरम वाटणे, हे नैसर्गिक आहे, असे म्हणत न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या शिक्षेत कपात केली.

मुंबई : पतीला भर रस्त्यात ‘नपुंसक’ म्हटल्यास त्याला शरम वाटणे नैसर्गिक आहे. त्याने केलेले कृत्य हे अचानक आणि गंभीर चिथावणीचे परिणाम होते. त्याबाबत त्याने पूर्वनियोजित कट केला नव्हता, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवत पत्नीची हत्या केल्याबद्दल जन्मठेप सुनावलेल्या आरोपीच्या शिक्षेत कपात केली. त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेचे रूपांतर १२ वर्षे कारावासात करण्यात आले.

आरोपीची पत्नी भर रस्त्यात आरोपीला ‘नपुंसक’ म्हणाली. असे लेबल लावल्यावर कोणत्याही पतीला शरम वाटणे, हे नैसर्गिक आहे, असे म्हणत न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या शिक्षेत कपात केली.

त्या दुर्घटनेच्या दिवशी अचानकपणे आरोपीला पाहिल्यावर आरोपीच्या मृत पत्नीने केवळ गळा पकडून त्याचा रस्ताच अडवला नाही तर भर रस्त्यात त्याच्या शर्टाला पकडून खेचत नेले. त्या वेळी त्याला शिवीगाळही केली आणि त्याच्यावर निंदनीय टिप्पणीही केली. त्यामुळे आरोपीने कट रचून तिची हत्या केली नाही. तर हे कृत्य अचानक व गंभीर चिथावणीचा परिणाम आहे, असे न्यायालयाने म्हटले.

आनंद मोरे याच्या राहत्या घराजवळील वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. मृत पत्नीने ओरडून केलेला आरोप सगळ्यांनी ऐकला. नपुंसक म्हणून उल्लेख करणे, हे शरमेचे वाटणे, हे पुरुषासाठी नैसर्गिक आहे. आरोपीने केलेले कृत्य अचानक व गंभीर चिथावणीतून केले आहे. पत्नीच्या हत्येचा त्याचा गुन्हेगारी हेतू नव्हता. त्याने स्वत:वरचे नियंत्रण गमावले व मारहाण करताना त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. पत्नीच्या हत्येचा कट त्याने केला नव्हता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

तो कामाला जात होता त्यामुळे त्याच्याकडे विळा होता. त्याने केलेले कृत्य कलम ३०० च्या ४ मधील अपवादात्मक स्थितीत मोडते. त्यामुळे त्याला आयपीसी कलम ३०४ (२) अंतर्गत शिक्षा ठोठावणे न्याय्य ठरेल, असे न्यायालयाने म्हटले. सत्र न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याने आरोपी त्या शिक्षेविरोधात अपिलात आला. आरोपी व त्याच्या पत्नीचे बसस्टॉपवरच भांडण झाले. पत्नीच्या  आरोपांमुळे चिथावलेल्या आरोपीने बॅगेतील विळा बाहेर काढून तिच्यावर वार केले.

घडलेली परिस्थिती विचारात घेऊन आरोपीला शिक्षा ठोठवावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. या दोघांचा विवाह १५ वर्षांपूर्वी झाला. त्यांना तीन मुले आहेत व घटनेच्या चार वर्षांपूर्वी ते दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांनी कधीही एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. मात्र, घटना घडली त्या दिवशी आरोपीच्या पत्नीने आरोपीशी भांडण केले. त्याला भर रस्त्यात शर्टाला पकडून खेचत नेले. त्यामुळे रागात आरोपीने पत्नीवर हल्ला केला, असे अपिलात म्हटले होते.

न्यायालयाने सरकारी वकील व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपीच्या जन्मठेपेच्या शिक्षेत कपात करत त्याला १२ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :मुंबई हायकोर्टजन्मठेपन्यायालय