थंडीचा नव्हे<bha>;</bha> हा तर ‘प्रदूषणा’चा महिना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:03+5:302020-12-13T04:24:03+5:30
* १० शहरांचा श्वास कोंडला : नवी मुंबई, मुंबई, कल्याण सर्वाधिक प्रदूषित लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ ...
* १० शहरांचा श्वास कोंडला : नवी मुंबई, मुंबई, कल्याण सर्वाधिक प्रदूषित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वायुप्रदूषणात वाढच होत असून, आता हिवाळ्याच्या सुरुवातीलादेखील मुंबईसह महाराष्ट्रातील दहा शहरांमधील वायुप्रदूषणाचे प्रमाण अधिकच नोंदविण्यात आले आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला असून, उत्तरोत्तर यात वाढच होत आहे. मुंबईत वरळी, विलेपार्ले, कुर्ला येथे नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक नोंदविण्यात येत असून,मुंबई, नवी मुंबई, कल्याण सर्वाधिक प्रदूषित आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्रातील १० शहरांच्या वायुप्रदूषणात भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट नोंदविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्मेंटने डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार विश्लेषण केले आहे. मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि खेळती हवा या दोन कारणांमुळे येथील प्रदूषण जास्त नाही. मात्र झालेल्या नोंदीनुसार, वायुप्रदूषण मुंबईत १० पट, नवी मुंबईत १६, कल्याणमध्ये ८ तर पुण्यात ५ पटीने अधिक नोंदविण्यात आले आहे.
* पुणे, नागपूर, नाशिकची हवा असमाधानकारक वरळी, विलेपार्ले, कुर्ला येथे नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. वाहन, उद्योग, बांधकामासह उर्वरित घटकांमुळे वायुप्रदूषणात भर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांशी तुलना करता प्रदूषणाचे प्रमाण २३ ते ३० टक्के अधिक आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, चंद्रपूर या शहरांमधील प्रदूषणाचे मोजमाप करण्यात आले. येथील हवादेखील फार समाधानकारक नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
कृती आराखडा राबवून अंमलबजावणीची गरज
गेल्या वर्षीच्या थंडीच्या तुलनेत या वर्षीच्या थंडीत मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण येथे नोंदविण्यात येणारे प्रदूषण अधिक आहे. यास इंधन ज्वलन, पार्किंग इतर असे अनेक घटक कारणीभूत आहेत. मुळात येथील स्वच्छ हवेसाठी कृती आराखडा हाती घेत त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. असे केल्यास निश्चितच आपणास प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल.
- अविकाल सोमवंशी, प्रोगाम मॅनेजर, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्मेंट
* निर्देशांक ८० ते १०० च्या आसपास
० ते ५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगला मानला जातो.
५१ ते १०० पर्यंत नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा साधारण चांगला मानला जातो.
१०१ ते १५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आजारी नागरिकांसाठी धोकादायक मानला जातो. मात्र मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण येथे नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (पीएम २.५) बहुतांशी वेळी ८० ते १०० च्या आसपास नोंदविला जातो.