Join us

तुंबई झाली तर खैर नाही...;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, नालेसफाईची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 1:56 PM

...मुंबईत पाणी तुंबले व त्याचा त्रास मुंबईकरांना झाला तर अधिकाऱ्यांची काही खैर नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली.

मुंबई : पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करू, मात्र नालेसफाईची कामे केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबले व त्याचा त्रास मुंबईकरांना झाला तर अधिकाऱ्यांची काही खैर नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल व इतर अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी मिठी नदी, वाकोला नाला, दादर येथील होल्डिंग पाँड, वरळीतील लव्हग्रोव नाला व स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, आमदार सदा सरवणकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, अमेय घोले व इतर अधिकारी उपस्थित होते. 

मिठीचा काळा रंग नक्कीच बदलणार मिठी नदीला पूर येऊ नये, नदीतील कचरा, प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मिठी नदीत नोव्हेंबर ते मे महिना या कालावधीत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी काळे होते. मात्र, यंदा सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याने मिठी नदीतील पाण्याचा काळा रंग भविष्यात नक्कीच बदलणार असल्याचे आयुक्त चहल म्हणाले.

रेल्वे मार्गात कल्व्हर्ट व नालेसफाई मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर अथवा कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, पावसाळ्यात रेल्वे मार्गावरही पाणी साचून रेल्वे वाहतूक बंद पडू नये, यासाठी रेल्वे मार्गालगतचे नाले व कल्व्हर्ट रुंद करा व त्यांची सफाई करवून घ्या, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

एका जागी बसून आढावा घेणारा मुख्यमंत्री नाहीतुम्ही राज्याचा मुख्यमंत्री असल्याने मंत्रालयात बसून पावसाळी कामांचा आढावा घ्या, असे मला सांगितले जात होते. मात्र, मी एका जागी बसून आढावा घेणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळेच मी स्वतः नालेसफाईच्या कामांची माहिती घेण्यासाठी पाहणी दौऱ्याला आलो, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

मुंबई सुरूच राहील नालेसफाईबाबत विश्वास व्यक्त करताना आयुक्त इक्बाल सिंह म्हणाले की, नालेसफाईचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, मुंबईत ढगफुटी झाली, दिवसाला ३०० मिमी पाऊस पडला तरी त्या क्षमतेने पाणी वाहून नेता येईल. मुंबई तुंबणार नाही नॉनस्टॉप सुरूच राहील.

कंत्राटदारांवर कारवाईकंत्राटदारांना ६०० कोटींची खिरापत वाटण्यात आली, हा आमदार अमित ठाकरे यांचा आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता कंत्राटदार बदलले आहेत. त्यांनी जर कामचुकारपणा केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे गेल्या २५ वर्षांत महापालिकेने जी काही विकासकामे केली, त्यांची चौकशी कॅगकडून व्हायला पाहिजे, ही चौकशी झाल्यास  ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल. वास्तव जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे केवळ थातूरमातूर नालेसफाईची कामे केली जाणार नाहीत. नदी, नाल्यांमधून किती टक्के गाळ काढला, किती टक्के नालेसफाई झाली, याची आकडेवारी व टक्केवारी हे महत्त्वाचे नसून नदी, नाल्यांमधील गाळ हा तळाला दगड लागेपर्यंत खोलवर साफ करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच नालेसफाई कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात येणार आहे.-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

 

 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदेमुंबई महानगरपालिकापाऊस