ती माझी नाही, तर कुणाचीच नाही! या विचाराने आफताबने श्रद्धाला संपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 08:13 AM2022-11-30T08:13:00+5:302022-11-30T08:13:27+5:30
चाचणीतून समोर येणारे निष्कर्ष पोलिस तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लिव्ह पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या आफताबने नेमकी कोणत्या हेतूने केली असावी, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. श्रद्धा आपल्यावर नाराज आहे, तिने वेगळे होण्याची तयारी सुरू केली आहे, हे आफताबला समजले होते. आपल्यापासून वेगळी झाल्यानंतर ती अन्य कुणासोबत तरी जाईल, असे त्याला वाटत होते. हे होऊ नये या विचाराने त्याने तिला संपवले, असा दावा आता केला जात आहे. दरम्यान, आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट करण्यास न्यायालयाने मंगळवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली. चाचणीतून समोर येणारे निष्कर्ष पोलिस तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
‘त्या’ हल्लेखोरांना कोठडी
आरोपी आफताब पूनावालावर सोमवारी शस्त्रात्रांसह हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुलदीप आणि निगम अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रशांत विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, एफएसएलच्या बाहेर निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे.
१ व ५ डिसेंबरला
नार्को चाचणी
n आफताबचे वकील अबिनाश कुमार यांनी सांगितले की, त्याला १ आणि ५ डिसेंबरला फॉरेन्सिक सायन्स लॅब, रोहिणी येथे नेण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता. त्याला परवानगी दिली आहे.
n रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून ही चाचणी होणार आहे.
n नार्को टेस्टमध्ये सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन आणि सोडियम एमायटल या औषधांचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे ती व्यक्ती संमोहन अवस्थेत राहते आणि खरी माहिती सांगण्याची शक्यता असते.
n सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार, नार्को, ब्रेन मॅपिंग व पॉलिग्राफ चाचण्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय करता येत नाहीत. मंगळवारीही आफताबची पॉलिग्राफ चाचणी झाली.