‘ते रॅगिंग नव्हे तर भांडण’, नायर रुग्णालयातील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 01:10 AM2019-10-06T01:10:19+5:302019-10-06T01:10:27+5:30
डॉ. बच्छी हाथिराम यांनी रॅगिंगविरोधी समितीला १७ सप्टेंबरला याविषयी कळविले.
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिचे आत्महत्या प्रकरण ताजे असताना, आता पुन्हा एकदा या ठिकाणी रॅगिंगचे प्रकरण घडल्याचे समजते. मात्र, तपशिलाअभावी चौकशी प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे स्पष्टीकरण नायर रुग्णालय प्रशासनाने दिले होते, परंतु हे प्रकरण रॅगिंगचे नसून, केवळ दोन डॉक्टरांमध्ये भांडण झाले होते, असे स्पष्टीकरण नायर रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
नायर वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभागांतील पदव्युत्तरच्या प्रथम वर्षीय विद्यार्थिनी डॉ. सादिया शेख तडवी, तिची वरिष्ठ सहकारी डॉ. रेश्मा बांगर या डॉ. मिलिंद नवलाखे यांच्या विभागात काम करतात. या दोन्ही डॉक्टरांमध्ये कामावरून वाद झाला. डॉ. तडवीने कामाचा त्रास होत असल्याची तक्रार करेन, असे डॉ. बांगर यांना सांगितले. घाबरलेल्या डॉ. बांगर यांनी १२ सप्टेंबरलसा वसतिगृहातील खोलीत तीन दिवस स्वत:ला कोंडून घेतले. वरिष्ठांना समजताच त्यांची समजूत काढण्यात आली.
डॉ. बच्छी हाथिराम यांनी रॅगिंगविरोधी समितीला १७ सप्टेंबरला याविषयी कळविले. २३ सप्टेंबरला समितीने पहिल्या बैठकीत प्रकरणाची सविस्तर माहिती लेखी देण्याचे आदेश दिले. मात्र, जेथे हा प्रकार घडला, तेथील विभाग प्रमुखांकडून पुरेशी माहिती देण्यात न आल्याने चौकशी प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे दिसून आले होते. मात्र, ही माहिती चुकीची असून, त्या दोन डॉक्टरांमध्ये केवळ भांडण झाल्याची माहिती नायर रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, हे रॅगिंग नव्हते, केवळ दोन विद्यार्थिनींत भांडण झाले होते. त्यानंतर, त्यांचे समुपदेशन केले. पालकांना बोलावून विभागप्रमुखांनी त्यांच्याशीही संवाद साधलो. केवळ प्रक्रियेचा भाग व प्रतिबंधात्मक प्रक्रिया म्हणून याबाबत रॅगिंग समितीला कळवावे लागते.