संतोष आंधळेमुंबई : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९ नोव्हेंबर रोजी प्रथम वर्ष एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग समितीने याप्रकरणी चौकशी करत रॅगिंग करणाऱ्या सहा इंटर्न्स विद्यार्थ्यांना निलंबित केले. मात्र, आता तक्रारदार विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनाला अर्ज केला असून, त्यात त्याने ती रॅगिंग नसून निव्वळ गंमत जंमत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यावर १०७ विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
रॅगिंगची तक्रार महाविद्यालय प्रशासनाला एका मेलद्वारे आली होती. त्यासोबत व्हिडीओही पाठविण्यात आला होता. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी तातडीने अँटि रॅगिंग समितीची बैठक बोलावून सत्यता पडताळून पीडित विद्यार्थ्याकडून माहिती घेतली. समितीने चौकशी करून अखेर त्या संबंधित रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना निलंबित केले. तसेच पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. याबाबतचा अहवाल त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय आयोगालाही पाठवला. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली. आता या घटनेनंतर तक्रारदार विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनाला अर्ज लिहून झाली घटना रॅगिंग नसून, गंमत जंमत असल्याचे अर्जात नमूद केले. या अर्जावर १०७ विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. प्रशासनाने हे पत्र अँटि रॅगिंग समिती आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना पाठवून दिले आहे.
पत्रावर १०७ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यायाप्रकरणी, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, “तक्रारदार विद्यार्थ्यांचा अर्ज प्राप्त झाला असून, त्याने ही रॅगिंग नसून गंमत असल्याचे नमूद केले आहे. तसेच यावर १०७ अन्य विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही हे पत्र अँटी रॅगिंग समितीला आणि विद्यापीठाला पाठवून दिले आहे.