मुंबई : मोसमातील पहिल्याच मुंबईतील काही भाग जलमय झाले. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढणारे पादचारी, वाहनचालकांची त्रेधातिरपिटच उडाली. दुसरीकडे, याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. पाणी साचल्याच्या मुद्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनंतर भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी कालच्या आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्लिप शेअर करत एक ट्विट केले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळाच्या वेळी 400 एमएम - 300 एमएम प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, असा दावा करताना दिसत आहेत. याच विधानावरून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
"तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात... उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली..." असे आशिष शेलार ट्विटमध्ये म्हटले आहे.
"म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.", असे आशिष शेलार म्हणाले.
याचबरोबर, "यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना...इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!" असेही आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?"मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे", अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, आदित्य म्हणाले, "पावसाळ्यात मुख्यमंत्री नाल्यात उतरले आणि सफाईचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र, नालेसफाई झालीच नाही. तरीही, मुंबईच्या तक्रारींकडे मुख्यमंत्री बोट दाखवत आहेत. स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके, हेच सरकारचे ध्येय असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते.