मुंबई : वांद्रे येथे रिकामी इमारत लगतच्या इमारतीच्या कम्पाऊंड वॉलवर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील दोन जखमींपैकी एकाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ब्रुस मायकल डिफेना (४१) असे मृताचे नाव आहे. ब्रूस यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सूरु होते. तर दुसरे जखमी अर्जुन यांनी वांद्रे येथील भाभा रुग्णालयातून स्वत:हून डिस्चार्ज घेतला आहे. सोमवारी रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली होती. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा उचलण्याचे काम मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होते. यासाठी ८ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, ४ जेसीबी, ५ डंपर्स, २२ कामगार, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता कार्यरत होते.मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी सकाळी पावसाचा तुफान मारा सुरु होता. सकाळी साडे आठच्या नोंदीनुसार मुंबईत ४४.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. मुंबईत पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतली. मात्र पडझड सुरुच होती. १२ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सोमवारी सकाळी १० वाजता कुर्ला पाईप लाईन येथे दरडीचा काही भाग कोसळला. सुरक्षेच्या कारणात्सव येथील दोन घरे रिकामी करण्यात आली आहेत. अग्निशमन दलामार्फत धोकादायक भाग बाजूला करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता चेंबूर येथे माऊंट मेरी सोसायटी परिसरात एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने एका घरात आग लागली. यात दोन जण जखमी झाले. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.