Join us

'भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं', डोंबिवली स्थानकातील गर्दी पाहून सुबोध भावेनं व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 8:28 PM

प्रवाशांची मोठी लूट रिक्षा, टॅक्सीवाल्याकडून करण्यात आली.   

मुंबई : मध्य रेल्वेने ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी कल्याण-डोंबिवलीदरम्यान घेतलेल्या 4 तासांच्या पॉवरब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आज ख्रिसमसनिमित्त सार्वजनिक सुट्टी होती. मात्र, काही खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे डोंबिवली स्थानकात मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी झाली होती. यातच या गर्डरच्या कामामुळे दर 15 मिनिटांनी डोंबिवलीहून सीएसएमटीकडे लोकल सोडण्यात येणार होती. मात्र, हे नियोजन फसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा वापर करावा लागला. यामुळे प्रवाशांची मोठी लूट रिक्षा, टॅक्सीवाल्याकडून करण्यात आली.   

डोंबिवली स्थानकातील आजच्या भीषण गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गर्दीचा व्हिडीओ मराठी अभिनेता सुबोध भावे याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यांनी खंत व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारला मुंबईकरांच्यावतीने एक विनंती केली आहे. "भयानक आहे हे, आणि हे रोज जगावं लागत, ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे. भारतीय रेल्वे सक्षम आहेच. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती", असे ट्विट सुबोध भावे याने केले आहे.  

दरम्यान, ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान मार्गावर आज हा ब्लॉक घेण्यात आला. सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत चार तास वाहतूक बंद करण्यात आली. सुटीच्या दिवशी प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने आज ख्रिसमसच्या सुटीचे औचित्य साधत चार तासांचा विशेष ब्लॉक घेतला. मात्र, डोंबिवलीहून सीएसएमटीकडे दर 15 मिनिटांनी लोकल सोडण्याऐवजी तासाभराने एखादी लोकल सोडल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  

टॅग्स :सुबोध भावे डोंबिवलीसोशल मीडियामध्य रेल्वे