याआधी ज्या पद्धतीने, ज्या वेगाने आपण जगत होतो; तो वेगच गेल्या सव्वा वर्षात थंडावला आहे किंवा मंदावला आहे, असे म्हणायला हरकत नाही. १५ मेच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त कोरोनाच्या या काळात तयार झालेली नात्याची घट्ट वीण कशी मोलाची आहे, त्याविषयी...
............................................
गेल्या सव्वा वर्षाच्या काळात काय काय बदलले आहे, हे बारकाईने पाहायला गेल्यास एक लक्षात येईल की, बऱ्याच घरांत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या मार्च महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत थांबल्यावर, उजाडलेल्या डिसेंबरपासून आपण थोडे-थोडे काम करण्यास सुरुवात केली, पण यंदाच्या मार्च महिन्यापासून आपण पुन्हा थांबलोय. गेले वर्षभर घरात सगळी मंडळी एकमेकांसमोर असल्याने गप्पा मारणे, सुसंवाद साधणे हे जास्त प्रमाणात झाले. यामुळे नव्याने एकमेकांची ओळख झाली; त्यांच्या आवडीनिवडी कळल्या. कुठल्या गोष्टी केल्या तर घरातल्या मंडळींना आनंद होतो किंवा राग येतो, हेही कळले. घराबाबत आपण नव्याने विचार करायला लागलो. महत्त्वाचे म्हणजे एकमेकांशी गप्पा वाढल्या. काहीच काम नसल्याने सर्वांना खूप वेळ मिळाला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे बऱ्याचशा कुटुंबांची नात्यातील वीण पुन्हा घट्ट होत गेली आहे.
आपल्या सगळ्या गप्पाटप्पा व्हॉट्सॲपवर व्हायच्या; मात्र जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर नवरा-बायको किंवा मुले आणि आई-वडील बसायला लागले; तेव्हा त्यांच्यासमोर बोलण्याचा विषय काय असू शकतो, हा प्रश्न नव्याने आला. एखादा वादग्रस्त विषय असताना तो बोलायचा कसा, शब्द कसे वापरायला हवेत, त्यावेळी सूर कसे असायला हवेत; या सगळ्याची ओळख नव्याने संपूर्ण कुटुंबाला झाली. सर्वजण घरातच असल्याने विषय अनेक होते. सुरुवातीला विषय सुचत नसले, तरी घर वगैरे आवरताना विषय, शब्द आणि संवाद वाढत गेले. अर्थात मी हे चांगल्या अर्थाने म्हणतोय. पण गेल्या सव्वा-दीड वर्षात या सगळ्या गोष्टी नव्याने बघायला मिळाल्या, नव्याने अनुभवायला मिळाल्या.
यात वेगळी एक बाजू म्हणजे, ज्यांचे स्वभाव अगदी दोन टोकाचे होते; त्यांच्यातले मतभेद वाढत गेले. चोवीस तास एकत्र असल्याचा तो एक परिणाम होता. शब्दाला शब्द वाढले, काहीजणांचे घटस्फोटही झाले असतील. पण ९० ते ९५ टक्के अशी घरे पाहण्यात आली की, त्यांच्यात आनंदी वातावरण तयार झाले. आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातवंडे यांचे एक प्रकारचे गेट-टू-गेदर अगदी रोजच्या रोज होत आहे.
१२ डिसेंबरपासून जेव्हा पुन्हा एकदा नाटके सुरू झाली, तेव्हा नाटकाला जोडपी खूप यायला लागली होती. एवढेच नव्हे; संपूर्ण कुटुंबेही नाटकाला येऊ लागली होती. यातून छान कौटुंबिक वातावरण तयार झाले. मला आठवते की, पूर्वी जेव्हा आम्ही नाटक बघून घरी यायचो, तेव्हा शिवाजी मंदिर ते हिंदू कॉलनीत येईपर्यंत आम्हा कुटुंबियांमध्ये त्या नाटकासंबंधी चर्चा व्हायची. तसे यावेळी मालिकांच्या बाबतीत झाले. रोज मालिका वगैरे कुठल्या बघायच्या, यावर कुटुंबांत चर्चा झडल्या. मालिका चांगली आहे, वाईट आहे, बरी आहे वगैरे पैलूंवर कुटुंबियांमध्ये मनमोकळी चर्चा झाली. त्यानिमित्ताने एकमेकांशी संवाद वाढला; हेही नसे थोडके!
- प्रशांत दामले (लेखक अभिनेते व नाट्यनिर्माते आहेत.)
(शब्दांकन : राज चिंचणकर)