मुंबई : पतीने ऑनलाईन बिअर ऑर्डर केली. मात्र, कॅशऑन डिलिव्हरी नसल्याने त्याने पत्नीला ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. पतीने पाठविलेल्या लिंकवर पैसे पाठविण्याच्या नावाने ठगाने त्यांच्या खात्यातील ४४ हजार रुपयांवर हात साफ केला आहे. त्यामुळे पत्नीवर सध्या पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या ३६ वर्षीय तक्रारदार गावदेवी परिसरात कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पतीने कॉल करून ऑनलाईन बिअर मागवली. परंतु त्यांना पेटीएमद्वारे पैसे पाहीजे असल्याचे सांगितले आणि त्यांना पेटीएमवरून व्यवहार करण्यास सांगितले. पतीने दिलेल्या क्रमांकावरून पेटीएमद्वारे ५ हजार ४८० रुपये पाठवले. पैसे पाठविल्याचा संदेशही पतीला पाठवला. मात्र, ठगाने पैसे आले नसल्याचे सांगून पेटीएम खाते बँक खात्याशी लिंक करण्यास सांगितले. ते लिंक नसल्यामुळे पैसे येत नसल्याचे सांगितले.
दरम्यान, तक्रारदार यांना बँक खाते लिंक करायचे नसल्यामुळे त्यांच्या बहिणीला पैसे पाठविण्यास सांगितले. यातच तिच्या खात्यातून १९ हजार २४१ रुपये वजा झाले. त्यांनी पुन्हा पेटीएमद्वारे व्यवहार करताच त्यांच्याही खात्यातून १९ हजार २४१ रुपये वजा झाले. याबाबत ठगाकडे विचारणा करताच त्याने कॉल घेणे बंद केले. अशात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने गावदेवी पोलिसांकड़े तक्रार दिली. त्यात अनोळखी कॉलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.