Join us

कॅरी बॅगचे जास्त पैसे आकारणे चुकीचेच!; ग्राहक चळवळीतील तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:11 AM

शोरूमने पिशवीसाठी घेतले तीन रुपये जास्त

मुंबई : नुकतेच चंदिगड कन्झुमर फोरमने दिलेल्या निकालानुसार, बाटा शोरूमने कॅरी बॅगवर ३ रुपये जास्त आकारल्यामुळे ग्राहकानेग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बाटा शोरूमवर ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. बाटा शोरूमने ग्राहकाकडून कॅरी बॅगवर वेगळे ३ रुपये घेतल्याने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. शिवाय फोरमने सर्व ग्राहकांना मोफत कॅरी बॅग देण्याचे आदेश दिले. काही ग्राहक २ ते ३ रुपये जास्त देण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत. परंतु छोट्या रकमेपासून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. त्यामुळे चंदिगड कन्झ्युमर फोरमने कॅरी बॅगचे जास्त पैसे आकारणाऱ्या शोरूमला नऊ हजारांचा दंड ठोठावण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून अशा प्रकारे कॅरी बॅगसाठी जास्त पैसे आकारणे चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे सचिव डॉ. मनोहर कामत यांनी यासंदर्भात सांगितले की, राष्ट्रीय हरित लवादाने सांगितल्यानुसार, दुकानदाराने ग्राहकाला प्लॅस्टिक पिशवी दिल्यावर पिशवीमागे २ ते ३ रुपये जास्त आकारावेत. तसेच दुकानदाराने त्या पैशाची नोंद बिलामध्ये करणे आवश्यक आहे. त्या पैशांचा वापर प्लॅस्टिक पिशवीची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाईल, असे महाराष्ट्र सरकारनेही आदेश दिले होते. पर्यावरणासाठी प्लॅस्टिक पिशवी घातक आहे. परंतु ग्राहकांकडून न सांगता किंवा जबरीने जास्त पैसे आकारले, तर ते चुकीचे आहे. त्यामुळे चंदिगड कन्झ्युमर फोरमने एक प्रकारे चांगला निर्णय दिला आहे.मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे म्हणाले की, मुंबईमध्ये चंदिगडसारखी केस अजूनपर्यंत ऐकिवात नाही. परंतु हा निर्णय पहिल्या टप्प्यातला आहे, अजून यावर अपील होऊ शकते. त्यामुळे त्यांनी ३ रुपयांवर ९ हजार रुपये दंड का आकारला आहे, हे तपासले पाहिजे. दरवेळेला ग्राहकांना ग्राहक न्यायालय इतकी मोठी रक्कम देतातच असे नाही. त्यामुळे ही केस अपवादात्मक म्हणून स्वागतार्ह आहे. किंबहुना ग्राहक न्यायालयाच्या अशा पवित्र्यामुळे समाजातील बºयाचशा अपप्रथांना आळा बसण्यास मदत होईल.

टॅग्स :ग्राहक