केईएम रुग्णालयातही आयव्हीएफ केंद्र होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 07:06 AM2023-01-01T07:06:11+5:302023-01-01T07:06:47+5:30
केईएममध्ये वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे.
मुंबई : मुंबईत शासकीय रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयात नव्या वर्षात सर्वसामान्यांकरिता आयव्हीएफ केंद्र सुरू होणार आहे. शासकीय रुग्णालयातील या पहिल्याच केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयात आयव्हीएफ केंद्र सुरू होणार आहे.
केईएममध्ये वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे.
डॉ. अंजली व अनिरुद्ध मालपानी दाम्पत्याने यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच केंद्राची उभारणी करण्यात येईल. डॉ. मालपानी हे केईएम रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असून, सर्वसामान्य जोडपे जीवनशैली व अन्य बदलांमुळे मुलांपासून वंचित राहू नये, या विचारातून हे पाऊल
उचलले आहे.
तीस वर्षांपूर्वी परदेशी जाऊन डॉ. मालपानी यांनी वंध्यत्व विषयावरील प्रशिक्षण घेतले.
आता हे ज्ञान सर्वसामान्य जोडप्यांना उपयोगी पडावे या उद्देशाने केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात साधारण १००
जोडप्यांवर दरवर्षी उपचार करण्यात येणार आहेत.
अनेकदा खर्च परवडत नाहीत, त्यामुळे दुर्बल- सामान्य घटकांतील नागरिक आयव्हीएफच्या पर्यायाकडे वळत नाहीत. त्याचप्रमाणे, खासगी आयव्हीएफ केंद्राच्या तुलनेत पालिका रुग्णालयातील केंद्रात किफायतशीर खर्चात उपचार करण्यात येतील. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे केंद्र वरदान ठरणार आहे.
- डॉ. संगीता रावत,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय