Join us

बाळ विक्रीला ‘आयव्हीएफ’ महिला दलालांची नाळ

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 06, 2024 9:08 AM

गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे.  

- मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी

गरीब कुटुंबीयांना हेरून बाळाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवून खरेदी करायचे. पुढे निपुत्रिक कुटुंबीयांना विक्री करणाऱ्या टोळीची धरपकड सुरू असतानाच, यामागे लपलेली ‘आयव्हीएफ केंद्रा’तील महिला दलालांची नाळही समोर आली. अंमलबजावणी कक्षाच्या कारवाईत आयव्हीएफ केंद्रात अंडी डोनेट करण्याच्या बहाण्याने या महिला निपुत्रिक दाम्पत्यांना हेरायचे. त्यांना मूल मिळवून देण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून, व्हॉट्सॲपवरून यांचे डीलिंग सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली.

गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे.  विक्रोळीतील कन्नमवारनगर येथे राहणाऱ्या कांता पेडणेकर यांच्या पाच महिन्यांच्या बाळाला शीतल वारे हिने १३ डिसेंबर, २०२२ मध्ये विक्री केल्याची माहितीच्या आधारे पथकाने मुंबई ते हैद्राबाद, आंध्र प्रदेशमध्ये पसरलेले बाळ खरेदी विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. चौकशीत  डॉ.संजय सोपानराव खंदारे (बीएचएमएस) व वंदना अमित पवार यांच्यामार्फत संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांना २ लाखांत विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पथकाने खंदारे आणि  वंदना यांनाही बेड्या ठोकल्या. डॉक्टर संजय खंदारे यांच्याकडे आलेल्या दाम्पत्याने मुलं होत नसल्याने कुणाकडून बाळ मिळेल का? याबाबत चौकशी केली. खंदारेने ओळखीच्या महिलेकडे चौकशी केली. तिच्याकडून वारेचा संपर्क झाला. वारेने विक्रोळीचे दाम्पत्य हेरले. गरीब कुटुंब त्यात तिसरीही मुलगी झाल्याने वारेने मुलीच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न दाखवून जाळ्यात ओढले. आईनेही दोन लाखांत मुलीची विक्री केल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.

तपासात शीतल वारे हिने तिचे एजंट साथीदार शरद मारुती देवर व स्नेहा युवराज सूर्यवंशी यांच्या मदतीने दोन ते अडीच लाखांत विक्री केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, लिलेंद्र देजू शेट्टी यांच्या ताब्यातून दुसरी मुलगीही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत १४ महिलांसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये  ४ बाळांची सुटका करण्यात आली. या टोळीने आतापर्यंत १४ हून बालकांची विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे.या टोळीने  महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांची विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील महिला दलाल या फर्टिलिटी एजंट, डोनर म्हणून काम करत असताना त्यांचा विविध दवाखान्यांशी संपर्क येतो. याचाच फायदा घेत असल्याने एजंट आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नवजात बालकांची विक्री करत होते. व्हॉट्सॲपवरून त्या एकमेकींच्या संपर्कात असायच्या. त्यावरूनच सगळे व्यवहार सुरू होते. 

यापूर्वीही गुन्हे शाखेच्या काळात कुठे नशेसाठी तर कुठे पैशांसाठी जन्मदात्यांनी बाळाला विकल्याचे समोर आले होते. हे जाळे देशभरात पसरले असून त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

टॅग्स :प्रेग्नंसी