मुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येला सात वर्ष पूर्ण होत असताना, विशेष सीबीआय न्यायालय या प्रकरणी आज निर्णय देणार आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी छोटा राजन याचा बुधवारी (2 मे) निकाल लागणार आहे. जे.डे. यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन व पत्रकार जिग्ना वोरा यांच्यासह अनेक जणांवर विशेष न्यायालयात खटला सुरू होता. 3 एप्रिल रोजी खटल्याची अंतिम सुनावणी झाल्यानंतर, विशेष न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल 2 मे रोजी देऊ, असे म्हटले होते.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे राजन अस्वस्थ होता आणि त्यात डे यांना मारण्यासाठी जिग्ना वोरा हिने चिथावणी दिली. त्यामुळे छोटा राजननं डे यांना मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी दिली.