Join us

‘जे. जे.’मधील वसतिगृहाच्या डागडुजीसाठी साडेआठ कोटी; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:07 AM

जे. जे. रुग्णालयात ३०० निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी इमारत आहे. गेली अनेक वर्षे या इमारतीची डागडुजी करण्यात आली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी अनेकवेळा वसतिगृहाची डागडुजी करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने जे. जे. रुग्णालय परिसरातील या इमारतीच्या अंतर्गत दुरुस्तीकरिता ८ कोटी ६० लाख ३४ हजारांचा निधी मंजूर केला आहे. निवासी डॉक्टरांची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन वसतिगृह केव्हा बांधणार, असा प्रश्न डॉक्टरांकडून विचारला जात आहे.  

जे. जे. रुग्णालयात ३०० निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी इमारत आहे. गेली अनेक वर्षे या इमारतीची डागडुजी करण्यात आली नव्हती. २०२२ मध्ये निवासी डॉक्टरांनी वसतिगृह वाढवावेत आणि आहे त्या वसतिगृहाची डागडुजी करावी, यासाठी आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोणतेही नवीन वसतिगृह बांधले गेलेले नाही. 

३०० निवासी डॉक्टर इमारतीच्या अंतर्गत डागडुजीसाठी सरकारने निधी मंजूर केला तो निर्णय चांगला आहे. मात्र, निवासी डॉक्टरांची वाढती संख्या बघता हे वसतिगृह कमी पडत आहे. त्यामुळे सरकारने नवीन वसतिगृह बांधण्यासाठी मोठी तरतूद करणे गरजेचे आहे.  केवळ जे. जे. रुग्णालयातच नव्हे तर राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चांगले वसतिगृह बांधणे काळाची गरज आहे. - डॉ. शुभम सोहनी, अध्यक्ष, जे. जे. निवासी डॉक्टर संघटना

जागा अपुरी पडतेगेल्या काही वर्षांत पदव्युत्तर शाखेच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. परिणामी, निवासी डॉक्टरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कनिष्ठ निवासी डॉक्टर ज्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतो. त्यावेळी त्याच्यासमोर राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या अशावेळी लहान खोलीमध्ये तीन निवासी डॉक्टर राहत असतात.